मुंबई - मेहबुबा मुफ्तीसोबत भाजपानं सरकार बनवले. त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान उपस्थित होते. आम्ही त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झालो नाही तसेच आम्ही नवाज शरीफचा केक कापायला गेलो नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांच्या महाबैठकीत उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्यावरून भाजपाने टीकास्त्र सोडले होते. त्याला ठाकरे गटाने उत्तर दिले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काश्मीर हा हिंदुस्तानचा भाग आहे. मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने सरकार बनवलंय. देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका वैगेरे करताना जरा जपून करा. आम्ही मुफ्तींच्या सोबत सरकार बनवले नाही. भविष्यात आम्ही अधिक चर्चा करू, आज या विषयावर उद्धव ठाकरे बोलतील. पण उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका, हे तुमचेच भूत आणि तुमचेच पाप आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
तसेच सर्वपक्षीय विरोधकांची बैठक होती. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. आमची भूमिका स्पष्ट आहे. मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचा पक्ष काश्मीरात राजकारण करतोय. त्यांच्यासोबत भाजपाने सरकार बनवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला सहभागी होते. त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवू नका. पीओके भारतात जोडण्याची भाषा करत होते. ते करावे. आम्ही पाटण्यात होतो आणि बैठक विरोधकांची होती. आम्ही एकत्र आहोत. एकत्रित निवडणुका लढवू, २०२४ च्या निवडणुकीत परिवर्तन घडवू असा निर्धार महाबैठकीत झाला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र राहायचंय असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
देश जळतोय, मोदी अमेरिकेत गेलेतमणिपूर ज्याप्रकारे पेटलंय, जळतंय, १०० हून अधिक लोक मृत्यूमुखी झालेत, मंत्री, आमदारांची घरे जाळली जातायेत. केंद्र सरकारच्या नियंत्रणात हा भाग राहिला नाही. अमित शाह गृहमंत्री असूनही मणिपूरचा हिंसाचार थांबवू शकले नाही. हे सरकारचे अपयश आहे. देशाच्या पंतप्रधांनांनी मणिपूर संदर्भात सर्व पक्षीय बैठक बोलवायला हवी. परंतु देश जळतोय आणि मोदी अमेरिकेत गेलेत अशी टीकाही संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.