मुंबई : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राजकीय पक्षांची एकमेकांवरील कुरघोडीही वाढत आहे. त्यात विशेषत: महापालिकेत सत्ताधारी असलेले शिवसेना-भाजपाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर प्रहार करत आहेत. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ‘कपटी आणि चाणाक्ष मित्रापासून सावध राहा’ असा सल्ला देत, मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधला, तसेच या निवडणुकीत आपल्याला वेळप्रसंगी या कपटी मित्रासोबत लढावे लागू शकते, असा सावधगिरीचा इशारा देत, स्वबळाची तयारी ठेवण्याचे संकेत दिले.मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वर उमेदवार पडताळणीसाठीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी घाटकोपर आणि शिवाजीनगरमधील उपशाखाप्रमुख, उपविभागप्रमुखांशी विस्तृत चर्चा केली. या वेळी उद्धव यांनी शिवसैनिकांशी बोलताना हा सल्ला दिला. उद्धव ठाकरे यांचा सल्ला म्हणजे, अप्रत्यक्षरीत्या भाजपावरच निशाणा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. उद्धव यांच्या या विधानावर भाजपा आता काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. बैठकीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले की, आजपर्यंत आपण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्यातील फुटून गेलेल्या गद्दारांशी लढलो. इतकेच नाही तर रक्ताचे नाते असलेल्या नातेवाईकांशीही लढलो. मात्र या निवडणुकीत आपल्याला वेळप्रसंगी कपटी आणि चाणाक्ष मित्रांसोबत लढावे लागू शकते; त्यामुळे अशांपासून सावध राहा.दरम्यान, युतीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच पारदर्शकतेच्या मुद्यांवरून भाजपाकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. त्यात मुंबईमधील एका खासदाराने सेनेला सद्यपरिस्थितीचे ज्ञान आणि भान असावे असे वक्तव्य करून पुन्हा डिवचले आहे. त्यामुळे युतीची चर्चा सुरू होण्याआधीच दोन्ही पक्षात वाद अधिकच वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)आज युतीच्या वाटाघाटींना सुरुवातमुंबई महापालिकेसाठी शिवसेना,भाजपा युतीच्या वाटाघाटींना आजपासून सुरुवात होणार आहे. पालिकेतील जागावाटप आणि प्रत्येकी अडीच वर्षांसाठी महापौर पद हेच या वाटाघाटीतील कळीचे मुद्दे ठरणार आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर भाजपाने वाटाघाटीची जबाबदारी सोपविली आहे, तर शिवसेनेकडून राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर किल्ला लढविणार आहेत. सोमवारी युतीच्या वाटाघाटीतील चर्चेची पहिली फेरी होणार आहे.युतीच्या जागावाटपाचा तिढा सोडविण्यापूर्वी महापौरपद अडीच वर्षांसाठी यायला हवे, या मुद्द्यावर शिवसेनेची सहमती मिळविणे आमची प्राथमिकता असणार आहे. दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी अडीच वर्षांसाठी महापौर पद असावे, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे.त्यामुळे महापौर पदाबाबत काही ठरल्यानंतरच जागावाटपावर सहमत होऊ शकते, असे भाजपाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. वाटाघाटातील शिवसेनेच्या अटींबाबत शिवसेना नेत्यांनी मौन बाळगले आहे. मात्र, पक्षाच्या सर्वेक्षणात स्वबळाचा कौल मिळाला असल्याने भाजपाला जास्तीच्या जागा सोडण्यास शिवसेनेचा विरोध राहण्याची शक्यता आहे.
‘कपटी मित्रा’पासून सावध राहा
By admin | Published: January 16, 2017 7:02 AM