मुंंबई : खगोलशास्त्राचे सखोल, सप्रात्यक्षिक शिक्षण देत अशा विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे भावी खगोलशास्त्रज्ञ घडविण्याचे काम आता भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि गुजरातमधील चारुस्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नांतून होत आहे . गुजरातमध्ये आनंद येथे देशातील पहिली जागतिक स्तरावरील खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणारी संस्था स्थापन झाली असून गुजरातमधील चारुस्यात परिसरात सुरू होत असलेल्या या संस्थेचे नामकरण ‘डॉक्टर मोहनभाई पटेल इन्स्टिट्यूट आॅफ एक्सलन्स इन अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ असे करण्यात आले आहे. जुलै २०१५ पासून या संस्थेत विद्यार्थ्यांना एम.फील, पीएच.डी आणि एमएस्सी या पदविकांकारिता प्रवेश दिला जाणार असून त्याकरिता पदवीस्तरावर गणित, भौतिकशास्त्र आणि भूगोल या विषयातील कमाल गुणाच्या बरोबरीनेच प्रवेशपूर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेद्वारेच विद्यार्थ्यांची खगोलशास्त्र अभ्यासक्रमाकरिता निवड केली जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात सूर्य आणि ताऱ्यांचे निरीक्षण या विषयाचा अंतर्भाव असणार आहे. १ लाख रुपये वार्षिक फी असणाऱ्या या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांना मोठा टेलिस्कोप आणि प्रात्यक्षिक किट दिले जाणार आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोबेल पुरस्कार प्राप्त भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलतज्ज्ञ विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणार आहेत. विज्ञान विषयात रुची असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शिष्यवृत्तीदेखील मिळणार आहे.दरम्यान, यंदाच्या वर्षातच प्रख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या शोधाचे शताब्दी वर्ष आणि खगोल शास्त्रज्ञ सर फ्रेड होयले यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधूनच भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि चारुस्यात यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष परिषदेचे आयोजन केले आहे.
नवे खगोलशास्त्रज्ञ घडणार
By admin | Published: June 16, 2015 3:32 AM