भिवंडी : राजकीय सत्तासंघर्षातून झालेल्या हल्ल्यात बळी गेलेले काँग्रेसचे गटनेत ेमनोज म्हात्रे यांच्यावर यापूर्वीही गोळीबार झाला होता. त्यात ते वाचले होते. त्यानंतर मंगळवारी पोलीस स्टेशनमधून येताना काही जणांनी त्यांना चुलत भाऊ घराजवळ आल्याचे सांगितले. पण वैमनस्य असल्याने तो कशाला भेटायला येईल या कल्पनेतून ते गाफिल राहीले आणि त्यांचा घात झाला, अशी चर्चा दिवसभर त्यांच्या कार्यकर्त्यांत होती. मनोज यांच्या अगोदर त्यांचे चुलते राजकारणात होते. पुढे मनोज यांना संधी मिळाली. आता मनोज यांनी बाजुला होत किंवा पक्षातील वजन वापरत संधी द्यावी, अशी त्यांचा चुलतभाऊ प्रशांत यांची इच्छा होती. त्याला मनोज तयार नसल्याने वाद होता. तो नंतर विकोपाला जात राजकीय वैमनस्याच्या पातळीवर गेला होता. २०१२ च्या भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळीच प्रशांत म्हात्रे यांना निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा होती. त्यावेळी तिकीट न मिळाल्याने वाद विकोपाला गेला होता. निवडणुकीनंतर काही काळात त्यांनी मनोज म्हात्रे यांच्या गाड्या जाळल्या आणि ठार मारण्यासाठी गोळीबार केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आॅक्टोबर २०१३ मध्ये कामतघर येथील कमलाकर पाटील यांच्या ‘अपनालय’ या कार्यालयातील मिटींग आटोपून नगरसेवक अरूण राऊत यांच्यासोबत बाहेर निघताना हा गोळीबार झाला होता. त्यात ते वाचले होते. नंतर तक्रारी झाल्या, पण त्यातून संघर्ष विकोपाला गेला होता. भिवंडी पालिकेत काँग्रेसचे सभागृह नेते असलेले मनोज म्हात्रे हे चौदा वर्षे अंजूरफाटाचे नगरसेवक होते. दोनदा स्थायी समितीचे सभापती होते. मागील वेळी त्यांनी उपमहापौरपदावर दावा केला होता. काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीणचे चार वर्षे काम पाहिल्याने त्यांचा संपर्क वाढला होता. १४ वर्षे ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)
निर्धास्त राहणे म्हात्रेंना भोवले
By admin | Published: February 16, 2017 2:06 AM