ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.११ - मूळ गोमंतकीय व्यक्ती आता पोर्तुगालची पंतप्रधान असल्याबाबत खरे म्हणजे गोमंतकीयांनी अभिमान बाळगायला हवा, असा सल्ला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिला. समान नागरी कायदा ही पोतरुगालने गोव्याला दिलेली देणगी आहे, असेही पार्सेकर म्हणाले.
पोर्तुगीजांनी एकेकाळी गोव्यात केलेल्या विध्वंसाबाबत पोर्तुगालच्या पंतप्रधानाने गोव्याची माफी मागायला हवी, अशी मागणी काही गोमंतकीयांनी केली होती. त्याविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी वरील विधाने केली. गोव्यावर साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांची राजवट होती पण आता मूळ गोमंतकीय व्यक्ती पोर्तुगाल देशाची प्रमुख आहे. आपण मूळ गोमंतकीय आहोत हे पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोन कोस्टा अभिमानाने व आनंदाने नमूद करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. मला विधानसभा निवडणुकीच्या दिवसांत कोणता वाद निर्माण करायचा नाही असेही ते माफीच्या मागणीच्या अनुषंगाने बोलताना म्हणाले. युरीच्या हल्ल्यानंतर पोर्तुगालने दहशतवादाचा निषेध केला होता हेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
निवडणुका झाल्यानंतर तुम्ही पोर्तुगालला या, असे निमंत्रणही मला पंतप्रधान आंतोन कॉस्टा यांनी दिले आहे. पंतप्रधान गोव्यात विश्रांतीसाठी आलेले आहेत, आम्ही निवडणुकीनंतर जर पोर्तुगालला गेलो तर त्यांच्याशी काही विषयांबाबत अधिक तपशीलाने बोलता येईल. तूर्त व्यापार, गुंतवणूक आदी विषयांबाबत खूप वरवरची चर्चा झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासोबत पंतप्रधान कॉस्टा यांची आल्तिनो येथे बुधवारी सकाळी बैठक झाली. त्या बैठकीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पर्यटन, हेरिटेज, अपारंपरिक उर्जास्रोत, पोर्तुगीज भाषा तसेच विज्ञान, समुद्रविज्ञान अशा क्षेत्रंमध्ये गोवा व पोर्तुगाल भागिदारीने काम करू शकतो अशा प्रकारची प्राथमिक चर्चा आम्ही पंतप्रधान कॉस्टा यांच्यासोबत केली. गोव्यातील वातावरण कसे आहे वगैरे गोष्टी कॉस्टा यांनी जाणून घेतल्या. आमचे पोर्तुगालशी अनेक वर्षाचे नाते आहे. समान नागरी कायद्याची देणगी पोर्तुगालने गोव्याला दिल्याचे पूर्ण देश मान्य करतो. हजारो गोमंतकीय पोर्तुगालमध्ये राहतात त्यांची काळजी घ्या अशी विनंती आपण पंतप्रधानांना केली आहे.
(खास प्रतिनिधी)