पुणे : नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड झाली पण संमेलन कुठे घ्यायचे, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. सातारा शाखा संमेलन मिळेल, या आशेवर अजूनही आहे. मात्र मागील काही अनुभव बघता संमेलन स्थळाचा निर्णय काळजीपूर्वक घेऊ, असे मध्यवर्ती शाखेतर्फे स्पष्ट करण्यात आले.नाट्यसंमेलनाचे आयोजकत्त्व मिळावे, यासाठी ठाणे शाखा आणि सातारा शाखा दावेदार मानल्या जात आहे. या दोघांपैकी एकाला संमेलन आयोजन करण्याची जबाबदारी मिळणार आहे. मोहन जोशी यांच्या वक्तव्यानंतर बेळगाव शाखेने संमेलन घेण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे ऐनवेळी संमेलन घेण्याची तयारी सातारा शाखेने दर्शविली होती. गेल्या तीन-चार वर्षांपासूनही संमेलन मिळावे, यासाठी सातारा शाखेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सातारा शाखेच्या जमेच्या बाजू बघता सातारा शाखेलाच यजमानपद मिळेल, असे वाटत होते. पण याबाबत निर्णय झाला नाही. सातारा शाखेने अध्यक्षपदासाठी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे नाव सुचविले होते. त्यांची अध्यक्षपदी निवड न झाल्याने दुष्काळाचे कारण देत संमेलन नको, अशी भूमिका सातारा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची चर्चा ऐकू आली. सातारा शाखेचे शिरीष चिटणीस म्हणाले, ‘‘संमेलन मिळण्यासाठी यापूर्वीच चर्चा झाली आहे. पण कुठल्याही अटी घातलेल्या नाहीत. दुष्काळी परिस्थितीमुळे संमेलन नाकारलेलेही नाही. सकाळपासून मुंबईत बसून आहे, पण काय निर्णय झाला, हे पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले नाही. (प्रतिनिधी)
अध्यक्ष ठरले; पण जागेचा अजूनही शोध
By admin | Published: October 19, 2015 2:00 AM