मुंबई - मागील पाच वर्षांत विरोधात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपदी संधी दिली होती. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर मुंडे यांना महत्त्वाचं खातं मिळेल असा अंदाज व्यक्त कऱण्यात येत होता. मात्र त्यांच्याकडे सामाजिक न्याय खातं सोपविल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी का दिली, या संदर्भात खुद्द शरद पवार यांनी खुलासा केला आहे.
शरद पवार यांनी इंदू मील येथील बहुचर्चित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायमंत्रीपद देण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीकडे सामाजिक न्याय खातं प्रथमच आले आहे. या खात्यामार्फत गोरगरीबांची कामे करणे शक्य आहे. त्यामुळे मुद्दाम हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
कमकुवत मंत्र्यांकडे सामाजिक न्याय खातं देण्याची प्रथा आजपर्यंत चालत आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे हे खातं दिल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु,हे खातं दिल्यामुळे मुंडे आनंदी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, सुनील बनसोडे हजर होते.