सौंदळा: परिसरातील वारखेड, वारी, पिंपरखेड, बादखेड या शिवारातील शेतकर्यांनी उन्हाळी भुईमुगाचा पेरा केला; परंतु भुईमुगाला भाव नसल्याने शेतकर्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसत आहे. सौंदळा परिसरातील वारखेड, वारी, पिंपरखेड, बादखेड या शिवारातील शेतकर्यांनी उन्हाळी भुईमुगाचा पेरा केला. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत अहोरात्र भुईमूग पिकाची मशागत केली. भुईमूग काढणीला आला असताना परप्रांतातून पोटाची खळगी भरण्यसाठी आदिवासी हजारो मजूर सौंदळ्यात दाखल झाले. भुईमूग काढणीला मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे वाहनाद्वारे सौंदळ्यात आले. बर्याचशा मजुरांना काम न मिळाल्याने ते रिकाम्या हातानेच गावी परत गेले. भुईमूग काढणी सुरू असतानाच भुईमुगाचे पीक एकरी ८ क्विंटलपासून ते २० क्विंटलपर्यंत कमी-जास्त प्रमाणात होत आहे. मार्केटमध्ये १५०० पासून तर ३३०० रुपयापर्यंत भुईमुगाला भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १२०० ते १४०० रुपये भाव कमी असल्याने शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. भुईमुगाची बीजवाई २० किलोची बॅग २४०० रुपयाला, तर भुईमूग १ क्विंटल २००० रु. ही कोणती तफावत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत शासनाने भुईमूग पिकाला हमी हमीभाव देऊन शेतकर्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
भुईमुगाला भाव नसल्याने शेतकर्यांचा अपेक्षाभंग
By admin | Published: May 12, 2014 7:09 PM