लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
बुधवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रूंदीकरणात बाधीत होणाऱ्या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली होती. मात्र कारवाई करताना इमारतीचा मलमा त्याच ठिकाणी टाकला. याचा परिणाम म्हणजे या इमारतीच्या मागे असणाऱ्या इमारतींकडे जाणारा रस्ता देखील बंद झाला. इतकंच नाही तर या राडा रोड्याखाली असलेल्या पाण्याच्या पाईप लाईन तुटल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही बंद झाले. या सर्व प्रकारामुळे दावडीतील नागरिक संतापले आणि शनिवारी संध्याकाळी नागरिकांनी दावडी गावातील दुसरा रस्ता सुद्धा बंद केला.
दावडी गावाकडे जाणा-या डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. या रस्त्यावरील पाच मजली इमारतीवर कारवाई करत ती जमीनदोस्त करण्यात आली. इमारतीच्या राडारोड्याचा ढीग रस्त्यात टाकण्यात आला होता.त्यामुळे या इमारतीच्या आसपास असलेल्या तब्बल 15 इमारतींकडे जाणारा रस्ता बंद झाला. नागरिकांना पायी चालायला आणि वाहनांना सुद्धा येथून मार्ग काढता येत नव्हता. या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली पाण्याच्या पाईप लाईन दाबल्या गेल्याने त्या देखील फुटल्या. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला असून कारवाई केलेल्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या इतर इमारतींना दोन दिवसापासून पिण्याचे पाणी आलं नाही. त्यामुळे नागरिक देखील हैराण झाले. अखेर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत दावडी गावातील दुसरा रस्ताही बंद केला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या सर्व घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि संबंधित बिल्डरने तात्पुरती पायवाट करून दिल्यानं नागरिकांनी माघार घेतली अशी माहिती राहिवासी ऍड माधुरी जोशी यांनी दिली.