शिरूर : असे नागरिक बना, की तुमच्यासाठी लढताना सैनिकांना गर्व वाटला पाहिजे, असे आवाहन एअर मार्शल अजित भोसले यांनी येथे विद्यार्थ्यांना उद्देशून केले. योग्य व पात्र भारतीय बनायचे असेल तर चारित्र्य, अनुशासन व क्रियाशीलता या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब करा, असा मूलमंत्रही भोसले यांनी दिला. शिरूर येथील चां. ता. बोरा महाविद्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालय नियामक मंडळाचे सदस्य चंद्रकांत बाफना अध्यक्षस्थानी होते. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्राचार्य नंदकुमार निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, कला शाखाप्रमुख प्रा. चंद्रकांत धावटे, विज्ञान विद्याशाखाप्रमुख डॉ. बी. आर. खोत, वाणिज्य विद्याशाखाप्रमुख प्रा. आर. ई. कोठावदे, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख डॉ. नारायण धनगावकर उपस्थित होते. भोसले म्हणाले, ‘‘चारित्र्य अनुशासन व क्रियाशीलता हे केवळ मिलिटरीलाच लागू नसून, प्रत्येक नागरिकाने ही त्रिसूत्री जोपासली पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर या त्रिसूत्रीबरोबरच वेळेचे नियोजन व कमिटमेंट या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.’’ व्यायाम, आराम, आहार तसेच लवकर उठणे याला महत्त्व देताना मोबाईल, टीव्हीपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. चित्रपटातील अनेक ‘हिरो’ असतील; मात्र मनोज पांडे, विक्रम बत्रा तसेच संदीप उन्नीकृष्णन हे खऱ्या जीवनातील खरे ‘हिरो’ असल्याचे भोसले यांनी अभिमानाने सांगितले. चंद्रकांत बाफना म्हणाले, ‘‘जीवनात चांगले काही निवडता आले पाहिजे. नाही निवडता आले तर किमान चांगले करता आले पाहिजे.’’ दरम्यान, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भोसले यांना सलामी दिली. (वार्ताहर)मुख्य कार्यक्रमाअगोदर भोसले यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांशी वार्तालाप केला. सैन्यदलात अधिकारीपदापर्यंत जाण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीच भोसले महाविद्यालयात आले होते. यातच देशभक्तिपर गीते, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ या घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडल्याने भोसले भारावून गेले. त्यांनी महाविद्यालयाला हवाईदलाचे गौरवचिन्ह भेट दिले. प्रा. क्रांती पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
...असे नागरिक बना; सैनिकांना गर्व वाटेल
By admin | Published: January 30, 2017 2:38 AM