शशी करपे / वसईअंधत्वावर मात करत आणि व्यवस्थेविरोधात न्यायालयीन लढा देऊन नालासोपाऱ्यातील कृतिका पुरोहित या तरुणीने फिजिओथेरपिस्ट ही पदवी संपादन करून देशातील पहिली अंध डॉक्टर होण्याचा मान मिळविला. अंधत्वाचे कारण देऊन तिला वैद्यकीय शिक्षणापासून रोखणाऱ्या व्यवस्थेला तिने ही पदवी मिळवून चपराकही लगावली आहे. ती नालासोपाऱ्यात आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिसरे अपत्य असलेल्या कृतिकाला वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दृष्टी गमावावी लागली. तिच्या डोळ्यांच्या शिरेला (आॅप्टिकल नर्व्हज) इजा पोहोचली होती. दृष्टी गमावली तरी तिने जिद्दीने अंधत्वावर मात करीत शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. इतकेच नाही, तर डॉक्टर होण्याचे स्वप्नही मनाशी बाळगले होते. पालकांनीही तिला साथ दिली. सीईटीत दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गाच्या गुणवत्ता यादीत ती पहिल्या दहात आली, तर तिला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा, असा निर्णय कोर्टाने दिला. तिने १२१ गुण मिळवून दिव्यांगांच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला. मदतनीसाच्या साह्याने तिने परीक्षेत यश संपादन केले. मात्र, सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविताना तिला पुन्हा अडथळा आला. या अभ्यासक्रमात लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असल्याने सरकारी कॉलेजमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला. कृतिकाने पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात धाव घेतली. यावेळीही न्यायालयाने तिला प्रवेश दिला जावा, असा आदेश दिला. त्यानंतर तिने मुंबई येथील सेठ जीएस मेडिकल महाविद्यालयातून फिजिओथेरपीचा चार वर्षांचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला. सहा महिने याच महाविद्यालयात तिने इंटर्नशिप पूर्ण करून ‘बॅचलर आॅफ फिजिओथेरपी’ ही पदवी प्राप्त केली. सध्या ती एका खासगी रुग्णालयात ‘फिजिओथेरपिस्ट’ म्हणून काम करत आहे. न्यायालय व पालकांच्या पाठिंब्याशिवाय मी यशस्वी होऊ शकले नसते, अशी कृतज्ञतेची भावना तिने व्यक्त केली आहे. प्रवेशासाठी न्यायालयीन लढा‘नॅब’च्या मदतीने तिने मुंबईतील शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. २०१०मध्ये बारावीनंतर तिला फिजिओथेरपी या वैद्यकीय अभ्यासक्रमाची सीईटी देण्याची इच्छा होती. पण, ‘डायरेक्टर आॅफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ने ती अंध असल्याचे कारण देऊन तिला प्रवेश नाकारला. तो प्रवेश मिळविण्यासाठी तिने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने तिला परीक्षेला बसू देण्याचा आदेश दिला.
अंधत्वावर मात करत ‘ती’ बनली फिजिओथेरपिस्ट
By admin | Published: January 11, 2017 5:16 AM