बीड: भाजप नेते आणि बीड जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (Aurangabad Bench) खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दरोड्याचा(Robbery) गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम 395 वाढवण्याच्या आदेशाने धस अडचणीत आले आहेत.
आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी 8 महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी 143, 147, 148, 149, 427, 336 आणि 379 ही कलमे लावली होती. त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली. त्यांनतर आता कलमांत वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
या कलमांची वाढ झालीमाधुरी चौधरी यांच्या रिट याचिकेमुळे दरोडा 395, बेकायदा घरात घुसने 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 453, यासह शांतता भंग करणे आणि इतर 341, 504, 506 ही कलमे लावण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काय प्रकरण आहे?आठ महिन्यांपूर्वी आष्टीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलविरोधात माधुरी चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्याचा राग मनात धरुन सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास दिला, अशी तक्रार माधुरी यांनी केली. तसेच, 19 जुलै रोजी धस आणि त्यांच्या समर्थकांनी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड केली, असा आरोप सुरेश धस यांच्यावर आहे.