Beed Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा प्रचंड गाजला आणि सरकारची कोंडी झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर करत बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली केली. तसंच देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं. मात्र हत्येच्या घटनेला १३ दिवस उलटून गेल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोपी पुरावे नष्ट करतील, अशी भीती व्यक्त करत आम्ही याप्रकरणी आम्ही मुंबई उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठात Criminal Writ Petition दाखल करणार आहोत, अशी माहिती दिली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, "१३ दिवस उलटले तरी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्यारे मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी फरार आहे. जर गृह खाते अशा प्रकारे निष्काळजीपणा करून दोषी आरोपी मोकाट फिरत असतील तर याविरुद्ध आम्ही दाद मागण्यासाठी मा. मुंबई उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठात Criminal Writ Petition दाखल करणार आहोत," असं दानवे यांनी सांगितलं.
दरम्यान, "आरोपी एवढे दिवस फरार असल्याने पुरावे ते सहज नष्ट करतील यात शंका नाही आणि उद्या कारवाई झाली तरी पुराव्यांअभावी ते दुसऱ्या दिवशी बाहेर असतील," असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
सुदर्शन घुले, वाल्मिक कराडला अटक नाही!
मस्साजोग हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवला. पोलीस अधीक्षक बारगळ यांनीही या प्रकरणाला सुरुवातीपासून गांभीर्याने घेतले नाही. आरोपी अटकेची सर्व जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवर दिली. या शाखेनेही त्यांना अटक केली नाही. त्यामुळेच बारगळ यांच्याविरोधात रोष वाढत गेला. एलसीबीवरच अवलंबून न राहता जिल्ह्यातील नेटवर्क असलेल्या इतर पोलिसांची मदत घेतली असती, तर हे आरोपी अटक झाले असते. मात्र बारगळ यांनी तसे केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.