बीड - मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. नुकतेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. या फोटोनंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनीवाल्मीक कराडसोबत इतर आरोपींवर दोषारोपपत्र ठेवले आहे. त्यात आता संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिचा तपासावेळी घेतलेला जबाब समोर आला आहे.
या प्रकरणाबाबत जबाब देताना वैभवी म्हणाली की, विष्णू चाटेचा माझे वडील संतोष देशमुख यांना कॉल आला होता. १०-१५ मिनिटे पप्पांचा कॉल सुरू होता. हा कॉल विष्णू चाटेचाच होता असं पप्पांनी सांगितले. भाऊ एवढं काय झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, जीवावर का उठता असं पप्पा कॉलवर म्हणत होते असं तिने सांगितले. त्याशिवाय माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे असंही संतोष देशमुखांनी लेकीला सांगितल्याचेही जबाबात नोंद आहे.
विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचा 'तो' संवादही जबाबात
विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह अन्य एक जण केजच्या नांदूरफाटा येथील तिरंगा हॉटेलात जेवायला गेले तिथेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला. चाटे आणि घुले यांच्या संवादाचा प्रत्येक शब्द सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे. त्यामुळेच वाल्मीक कराड हा हत्येत आरोपी तर झालाच पण या सर्व कटाचा तो मास्टरमाईंड असल्याचंही उघड झाले.
काय झाला होता संवाद?
चाटे याने सुदर्शन घुले याला चांगलेच झापले, आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळे करायचे. स्वत:ची इज्जत घालवलीस, तुला प्लांट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आला असं चाटेने म्हटलं. त्यावर घुले याने चाटेला सांगितले की, आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो, तिथे संतोष देशमुख आला आणि त्याने आम्हास कंपनी बंद करू दिली नाही. मस्साजोगच्या लोकांनी आम्हाला हाकलून लावले. त्यावर चाटेने वाल्मीक अण्णाचा निरोप आहे, कामही बंद केले नाही, खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांनाही संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतीत असा संदेश दिला. वाल्मीक कराड याच्या सांगण्यानंतरच संतोष देशमुखची हत्या करण्यात आली.