मुंबई - बीड प्रकरणी पक्ष वैगेरे न बघता जर कुणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही असं मी मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितले आहे. मुख्यमंत्रीही त्याच मताचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपी मिळायला उशीर होत असला तरी तपास करून फोन कुणाकुणाला झाले, किती वेळ झाले, काय संभाषण झाले या सगळ्यांचा बारकाईने तपासल्या जातील. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना अजिबात खपवून घेणार नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, बीडमध्ये निर्घुणपणे झालेली हत्या आहे. सरकार यात गांभीर्याने लक्ष देतंय. सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना काय बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र ते करताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी घ्यावी लागते. माझी कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे. या प्रकरणात मी आणि मुख्यमंत्री जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. दोषींना कठोर शिक्षा केली जाईल आणि वेगळा संदेश महाराष्ट्राला दिला जाईल असं त्यांनी म्हटलं.
तसेच सुरेश धस यांना मी सांगितलंय, नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे एसआयटीला द्या. तपास यंत्रणेला द्या. पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे पुरावे द्यावे. याबाबत मी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे असं सांगत अजित पवारांनी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यावर भाष्य केले.
दरम्यान, एखाद्यावर आरोप झाला तर त्याची चौकशी सुरू आहे. आज एसआयटी चौकशी सुरू आहे. सीआयडी चौकशी सुरू आहे. न्यायालयाची चौकशी आहे. तिन्ही वेगवेगळ्या यंत्रणा तिथे चौकशी करतायेत. या चौकशीतून जो कुणी दोषी असेल, या घटनेशी संबंधित असेल तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणालेत असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.