परळी - सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणात चर्चेत असणारा वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र यावरून परळीत कराड समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून येते. वाल्मिक कराडवर मकोका लावताच काही समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून परळी बंदची हाक दिली. त्याशिवाय वाल्मिकच्या आईनेही सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. माझ्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून द्या असा पवित्रा वाल्मिक कराडच्या आईने घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वाल्मिक कराडला जामीन मिळेल या आशेने आज त्याचे समर्थक परळीत जमले होते. परंतु न्यायालयाने कराडवर मकोका लावण्याची परवानगी दिली. आता मकोका अंतर्गत वाल्मिक कराडला एसआयटीच्या ताब्यात दिले आहे. परळीत कराड समर्थकांनी ठिय्या सुरू केला आहे. सकाळपासून वाल्मिक कराड यांच्या आईपासून इतर लोकांनी अन्नत्याग केला आहे. यात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश आहे. याठिकाणी शासकीय वैद्यकीय पथक तैनात असून काहींना तातडीने उपचार केले आहेत. त्याशिवाय २ रुग्णवाहिकाही घटनास्थळी उभ्या करण्यात आल्या आहेत.
वाल्मिक कराड याच्या आई पारूबाई कराड या ७५ वर्षाच्या आहेत. सकाळपासून त्यांनी अन्नपाणी त्याग केले आहे. लोकांनी त्यांना आग्रह करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पाणी पिण्यासही नकार दिला. रॉकेलचा डबा आणून माझ्या अंगावर टाका आणि पेटवून द्या असं त्या सातत्याने बोलत आहेत. माझ्या लेकावर गुन्हे दाखल केले जातायेत. महिना झाला माझा लेक माझ्या नजरेसमोर नाही असं त्यांनी सांगितले. तर काही समर्थकांकडून वाल्मिक कराड याच्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
वाल्मिक कराड समर्थकाने बीड पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतले त्यावेळी उपस्थितांमध्ये खळबळ माजली. २ कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले त्यांना इतर समर्थकांनी थांबवले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही खबरदारी घेत तरुणांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. वाल्मिक कराड समर्थकांकडून आक्रमक घोषणाबाजी केली जात होती. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी समर्थकांकडून होत आहे. आत्मदहनाच्या या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.