- प्रताप नलावडे / ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 30 - कोणा एकाचे नेतृत्व नाही आणि कोणताही चेहरा नाही तरीही सामाजिक संवेदनेतून आपल्या भावना मुकपणे व्यक्त करण्यासाठी आलेल्या पाच लाख लोकांनी काढलेल्या मोर्चाची नोंद बीडच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात झाली आहे. लोकांनी सकाळपासून ते पार मोर्चा संपेपर्यंत आणि संपल्यानंतरही शिस्तीचे घडविलेले दर्शनही अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.
कोपर्डीच्या अत्याचाराच्या घटनेने व्यथित झालेल्या समाजाची उमटलेली ही मुक प्रतिक्रिया अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात किती बोलकी होती, हेही बीडकरांनी मंगळवारी अनुभवले. गेली पंधरा दिवसांपासून मराठा क्रांती मुक मोर्चाची जिल्ह्यात चर्चा सुरू होती. या मोर्चाला कोणा एकाचे नेतृत्व नव्हते तर उत्स्फुर्तपणे उमटलेली ही सामुदायिक प्रतिक्रिया होती. एरवी मोर्चा म्हटले की चार दोन लोकांचे नेतृत्व आणि त्या नेत्याच्या नावावर गोळा होणारे लोक, असे समिकरण असते. या मोर्चात मात्र कोणताही राजकीय चेहरा नव्हता, कोणताही नेता नव्हता, कोणाच्याही नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन नव्हते. मोर्चात सहभागी झालेला प्रत्येकजण मी या मोर्चात असले पाहिजे, या भावनेने सहभागी झाला होता. त्यामुळे प्रत्येकाने स्वंयप्रेरणेने मोर्चातील शिस्तही पाळली.
मोर्चाची सुरूवात स्टेडियम कॉम्पलेक्समधून होणार होती. याठिकाणी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक जमा होत राहिले. लोक मोर्चासाठी येत होते, त्यावेळीही त्यांच्यासोबत कोणी नेता नव्हता. लोकांनी लोकांच्यासाठी लोकभावनेतून काढलेला मोर्चा असेच या मोर्चाचे वर्णन करावे लागेल. आजवर बीडमध्ये अनेक मोर्चे निघाले. परंतु या सर्व मोर्चांचे रेकॉर्ड बे्रक करणारा हा मोर्चा ठरला.
मोर्चातील महिलांचा सहभागही खूपच लक्षवेधी होता. पुरूषांच्या बरोबरीनेच महिलाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आमच्या मुलीबाळींवर अत्याचार होत असताना आम्ही घरात कशा काय बसणार, असा त्यांचा सामुदायिक सवाल ऐकायला मिळत होता. ग्रामीण भागातूनही खूप मोठ्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चात रोजगार बुडवून आलेल्या महिला जशा होत्या, तसेच रजा टाकून खास मोर्चासाठी आलेल्या नोकरदार महिलाही होत्या. कधीही घराच्या बाहेर पडल्या नाहीत, अशा घरातील महिलांनीही हाताला काळी रेबीन बांधून आणि हातात भगवा झेंडा घेऊन नोंदविलेला आपला सहभाग खूपच बोलका होता.
बीड शहरातील जातीय सलोखाही किती मजबुत आहे, हे या मोर्चाच्या निमित्ताने दिसून आले. मोर्चा जेव्हा बशीरगंज या मुस्लीम इलाक्यातून जात होता, त्यावेळी येथील मुस्लीम नागरिकांनी आणि तरूणांनी मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मुस्लीम तरूणांनी मोर्चातील महिलांना पाण्याच्या पाऊचचे वाटप करून त्यांच्या संवेदनांशी आपणही तितकेच सहमत असल्याचे दाखवून दिले. मोर्चातील लोकांची व्यवस्था करण्यासाठी दोन हजार स्वयंसेवक राबत होते. पिण्याच्या पाण्यापासून ते अल्पोपहारापर्यंची सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती.
ऐरवी मोर्चाचे श्रेय लाटण्यासाठी चढाओढ लागलेली असते. परंतु या मोर्चात मात्र श्रेय घेण्याचा कुठेही कुणीही प्रयत्न केला नाही. अगदी पहाटेपासून मोर्चात सहभागी असणाºयांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करणाºया तरूणाला ही व्यवस्था कोण कोण करत आहे, असे विचारल्यावर त्याने नम्रपणे आपले नाव कोठेही प्रसिध्द करू नका, आम्ही सगळेजणच हे काम करतोय, त्यामुळे कोणा एकाला श्रेय नको, असे सांगितले. हीच गत मोर्चाचे पंधरा दिवसापासून दिवसरात्र नियोजनात गुंतल्या मंडळींचेही होते. ‘मराठा समाज’ या नावाखाली ही सगळी मंडळी कार्यरत होती. शिवाजीराव पंडित यांच्यासारखे जिल्ह्यातील जेष्ठ नेतेही सतरंजीवर सगळ्यांसोबत नियोजनाच्या बैठकीत बसत होते.