चार वर्षांची शिक्षा : गर्भलिंग निदान प्रकरण
परळी (बीड) : गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी सोमवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे या दाम्पत्याला चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. डॉ. सुदाम मुंडे अन्य एका प्रकरणात सध्या नाशिक कारागृहात शिक्षा भोगत आहे. १९ सप्टेंबर २०१० रोजी लेक लाडकी अभियानच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी मुंडे दाम्पत्याच्या दवाखान्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून आरोग्य विभागाकडे त्याची तक्रार केली होती. त्यानंतर मुंडे दाम्पत्यास अटक झाली होती. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. शहर पोलिसांनी तपास करून प्रकरण परळी न्यायालयात दाखल केले. सुरुवातीला सरकारी वकील म्हणून अॅड. अतुल तांदळे यांनी बाजू मांडली. न्या. एल.जी. पाच्छे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास दुधाळ, तत्कालीन उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, अॅड. वर्षा देशपांडे, अॅड. शैला जाधव, गरोदर माता प्रेरणा भिल्लारे, नायब तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. आठ कलमांनुसार प्रत्येकी सहा महिने कैद व १० हजार रुपये दंड अशी ४८ महिने कैद व ९० हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने ठोठावली. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. बालाजी आयनिले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)