Pankaja Munde Anjali Damania: 'सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं आहे', असे राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं. सुरेश धस सातत्याने परळी आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवरून धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत आहेत. त्यावर बोलताना पंकजा मुंडेंनी टीका केली. पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेनंतर अंजली दमानियांनी मुंडे बहिणभावाने बीड बदनाम केलं, अशा शब्दात हल्ला केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंजली दमानिया म्हणाल्या, "पंकजा मुंडे ताई, तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते. तुमच्या मतदारसंघात झालेल्या इतक्या क्रूर हायतेबद्दल तुम्ही खरतर रोज बोलायला हवं होतं, त्या कुटुंबाच्या घरी जायला हवं होतं. जन आक्रोश मोर्च्यात सहभागी व्हायला हवं होतं. पण तुम्ही ह्यातलं काहीच केलं नाही", अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
अजंली दमानियांची धस यांच्यावरही टीका
"बीड बदनाम आपोआप नाही होत, तुम्ही भावबहिणीने बदनाम केलं आहे तुमच्या दहशतीने. धस पण त्यातलेच एक आहेत", असे म्हणत अंजली दमानिया यांनी आमदार सुरेश धस यांनाही लक्ष्य केले.
"तुम्ही म्हणता तुम्ही बीडमध्येच राहता आणि तुम्ही एक महिला देखील आहात, पण तुम्ही हे विसरता की हे गुंड तुमचेच आहेत आणि तुम्हाला सुरक्षा आहे, सामान्य जनतेला नाही. तुमच्या गुंडांची दहशत त्या सामान्य जनतेला भोगावी लागते", असा संताप अंजली दमानियांनी व्यक्त केला.
पंकजा मुंडे सुरेश धस यांच्याबद्दल काय बोलल्या आहेत?
कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना सुरेश धस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्या म्हणाल्या, "त्यांच्यामुळे (सुरेश) बीड बदनाम झालंच आहे. कारण शेवटी या विषयाची ज्या पद्धतीने राज्यात मांडणी झाली आहे. त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितले असते, तर असे झाले नसते. आम्हीही बीडमध्ये राहतो. बीडमध्ये आम्ही रोज राहतो. मी एक महिला आहे, बीडमध्ये काम करते", असे उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले.