बीड : जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान ‘रॉकी’ रविवारी पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये झळकला. रॉकीच्या मृत्यूनंतर बीड पोलिसांनी दिलेल्या सलामीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.आठ वर्षांपूर्वी ६ महिन्यांचा असताना रॉकी बीड पोलीस दलात दाखल झाला. नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्याने अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत केली. रॉकीने २०१६ मध्ये कर्नाटकच्या म्हैसूरमधील स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. रॉकीने १५ आॅगस्टला अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस दलाच्या वतीने फैरी झाडून त्याला मानवंदना देण्यात आली. या कृतीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ‘काही दिवसांपूर्वी टीव्हीवर आपण एक भावनिक दृष्य पाहिले असेल. पोलीस दलाने श्वान रॉकीला सन्मानाने अंतिम निरोप दिला. या रॉकीने ३०० पेक्षा अधिक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत केली होती,’ ‘मन की बात’मध्ये हे सांगत असताना पंतप्रधान भावनिक झाले होते.कर्तव्यनिष्ट प्राण्याने केलेल्या कामाचे कौतुक आपण केले पाहिजे. पोलीस दलातील काही वाईट प्रवृत्तीची चर्चा नेहमी होते. चांगल्या कामाचीही चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून सर्वांना चागंले काम करण्याची प्रेरणा मिळेल. आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीड पोलीस दलाकडून मी आभार व्यक्त करतो. - हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक, बीड
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये बीडचा ‘रॉकी’ पोलीस दलाने दिलेल्या मानवंदनेचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 6:48 AM