अकोला, दि. १६- मार्ग परिवर्तनाच्या कामासाठी अकोला-अकोट मीटरगेज रेल्वे मार्ग १ जानेवारीपासून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी ३.३0 च्या सुमारास गांधीग्रामच्या पूर्णा नदीवरील रेल्वे पुलावरून साहित्याची ने-आण करणार्या १५ रेल्वे कर्मचार्यांवर मधमाशांनी हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या १२ जणांना अकोला सर्वोपचारमध्ये, तर उर्वरित तिघांना अकोट येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.मार्ग परिवर्तनासाठी बंद करण्यात आलेल्या अकोला-खांडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात अकोला-अकोटदरम्यानच्या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सर्वप्रथम उगवा, गांधीग्राम व पाटसूळ जवळ रेल्वे पूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून गुरुवारी द. मध्य रेल्वेचे १५ कर्मचारी रेल्वे पूल उभारणीसाठी लागणार्या साहित्याची ने-आण करीत होते. दरम्यान, पूर्णा नदीवरील रेल्वे पुलावरून जात असताना अचानक उठलेल्या पोळातील मधमाशांनी रेल्वे कर्मचार्यांवर हल्ला चढविला. पुलाच्या मध्यभागी ह्यइकडे आड तिकडे विहीरह्ण अशी परिस्थिती झालेली असताना सर्वांनी जीव मुठीत धरून धाव घेतली. यात घटनेतील गंभीर जखमी झालेले गौरव गौतम, डी. संतोषकुमार, राजेश दौलत, रवींद्र इंगळे, जितेंद्र बैरवा, धनराज, कैलाशचंद्र मीणा, भवरलाल मीणा, आकाश प्रल्हाद, शेख जाफर शेख मस्तान व सुबोध कुमार यांना अकोला सर्वोपचारमध्ये, तर आदित्य मुकुंद गायकवाड, प्रशांत व अमिन शेख बेबा या तिघांना अकोट येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
रेल्वे कर्मचा-यांवर मधमाशांचा हल्ला!
By admin | Published: February 17, 2017 2:55 AM