मुंबई - मनसेच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. राज ठाकरे अमित ठाकरेंना पुढे का करत आहेत? मनसेचा पुढचा चेहरा म्हणून संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना पुढे का आणत नाहीत. दुसऱ्यांना शिकवण्याआधी स्वत:कडे पाहावं अशा शब्दात शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
मनिषा कायंदे म्हणाले की, जो तो उठतो बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय म्हणतो. बाळासाहेबांचे फोटो लावतायेत. तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असाल तर जनतेने तुम्हाला सत्ता का दिली नाही. जनतेने तुमच्या तोंडून ते विचार ऐकलेत का? २००९ च्या विधानसभेत लोकांनी भरभरून मतदान केले पण पुढे काय झाले? उद्धव ठाकरेंनी २०१४ मध्ये स्वत:च्या हिमतीवर ६३ आमदार निवडून आले. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून त्यांचे नेतृत्व पुढे उभं राहिलं असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.
मनिषा कायंदे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. कायंदे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तासनतास दिल्लीत जाऊन बसतात. सातत्याने दिल्लीसमोर मुख्यमंत्र्यांना मान झुकवावी लागते. माईक खेचणे, चिठ्ठ्या पाठवणे हे सगळं राज्यातील जनता पाहतेय. निवडणुका सर्वांसाठी खुलं मैदान आहे. पक्ष तुमच्या पाठिशी होता म्हणून तुम्ही निवडून आला. अब्दुल सत्तार यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, निवडून येत असता तर काँग्रेस सोडून शिवसेनेत आला नसता असा टोला त्यांनी सत्तारांना लगावला.
तसेच पक्षाचा एबी फॉर्म सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे उमेदवाराला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळतं. कार्यकर्त्यांची मोठी फौज मिळते. हे कार्यकर्ते उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचं रान करतात. उद्धव ठाकरे तुमच्या पाठिशी होते म्हणून हे आमदार निवडून आले. जनता या बंडखोर आमदारांना उत्तर देईल. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली गाठावी लागते हे दुर्दैव आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानानं भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील दु:ख बोलून दाखवलं असंही मनिषा कायंदे म्हणाल्या.