केदार लेले / ऑनलाइन लोकमत
लंडन, ता. 3 - लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस २०१७) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा 85वा वर्धापन सोहळ्यानिमित्त विविध दि. ३ आणि ४ जून रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
"एलएमएस"च्या अध्यक्षस्थानी पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडोर डेविड एलफोर्ड होते. यावेळी पीएमजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, हनुमंत गायकवाड, अभिनेते मोहन आगाशे, सयाजी शिंदे, लेखिका मीना प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र मंडळला 85 वर्षे पुर्ण झाल्यामुळे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपप्रज्वलाने कार्यक्रमाच्या सुरवात झाल्यानंतर ढोल-ताशांचा गजर, गणेश वंदना, जय महाराष्ट्र जयघोष व पोवाड्यांनी परिसर मराठमोळ्या वातावरणाने दुमदुमून गेला.
शाहीर नंदेश उमाप यांच्या पोवाड्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अच्युत गोडबोले यांनी सादर केलेल्या नादवेध कार्यक्रामाने उपस्थितांची मने जिंकली.
यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या सोहळ्याच्या आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी पुण्याहून लंडनला ट्रस्टी आले आहेत. त्यांनी युके वासियांना महाराष्ट्र मंडळ लंडन आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
कार्यक्रमावेळी "एलएमएस"च्या विविध मान्यवरांनी लिहिलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्ष सुशील रापतवार, वैशाली मंत्री अनिल नेने व गोविंद काणेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.