...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:48 PM2020-01-04T13:48:17+5:302020-01-04T13:49:22+5:30

नवनिर्वाचित मंत्र्याचे खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

... This is the beginning of the fall of the Mahavikas Aghadi government - Devendra Fadnavis | ...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Next

वाशिम/मुंबई - राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागल्यानंतर आता विरोधात असलेल्या भाजपाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्याचे खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सत्तारांच्या राजीनाम्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तारांचा राजीनामा ही या सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

राज्यात मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून सुरू असलेल्या घोळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ''महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर विस्तारच होत नव्हता. एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता सात दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. आता खातेवाटप होण्यापूर्वीत त्यांच्या एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू म्हणून आश्वासन देऊन राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे,'' असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 



यावेळी युती तोडून महाविकास आघाडीत सामील झालेल्या शिवसेनेवरही फडणवीस यांनी जोरदार टीका केली. ''युतीमध्ये लढायचं आणि निवडून आल्यावर पळून जायचं असं, महाराष्ट्रात आधी कधी घडले नव्हते. शिवसेनेने विश्वासघाताचं राजकारण केलं आहे. भाजपाच्या भरवशावर निवडून आलेली शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली. महाराष्ट्रात सत्तेवर आलेले सरकार हे जनतेने निवडून दिलेले नाही. तर विश्वासघाने तयार झालेले सरकार आहे. भारताच्या राजकीय इतिहासात बेईमानी, विश्वासघाताने तयार झालेले सरकार कधीच सहा ते आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकलेले नाही. हे सरकार फाळ काळ टिकणार नाही,'' असे भाकितही त्यांनी केले.  

दरम्यान,  मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले होते. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले. अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.   

Web Title: ... This is the beginning of the fall of the Mahavikas Aghadi government - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.