वाशिम/मुंबई - राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागल्यानंतर आता विरोधात असलेल्या भाजपाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्याचे खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सत्तारांच्या राजीनाम्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तारांचा राजीनामा ही या सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. राज्यात मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून सुरू असलेल्या घोळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ''महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर विस्तारच होत नव्हता. एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता सात दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. आता खातेवाटप होण्यापूर्वीत त्यांच्या एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू म्हणून आश्वासन देऊन राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे,'' असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 1:48 PM