ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ९ - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला. या गदारोळातच राज्यपालांनी अभिभाषण दिलं. राज्यपालांनी इंग्लिशमध्ये अभिभाषणास सुरुवात केल्याने विरोधकांनी आक्षेप घेत मराठीत अभिभाषण करण्याची मागणी केली.
विरोधकांनी डान्स बार सुरु करणा-या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. चारा छावण्या बंद करुन डान्स बार सुरु करण्यावर विरोधकांनी आक्षेप दर्शवला. दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने 2500 कोटींची तरतूद केली असून आतापर्यंत सरकारने शेतक-यांना 2536 कोटींची मदत केली आहे. दुष्काळप्रश्नी राज्य सरकार संवेनदशील असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. 1 लाखांपेक्षा जास्त शेतक-यांसाठी कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अंतिम टप्यात आहेत. दुष्काळी भागातील शेतक-यांसाठी वीजपुरवठ्याची मदत सरकार करत असल्याचंही राज्यपालांनी अभिभाषणादरम्यान सांगितलं आहे.