ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 21 : फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ७ कोटी ३५ लाखांचा आराखडा तयार केला आहे.गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक आहे. मात्र पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच कृषी व अन्य क्षेत्रासाठी होणारा वापर यामुळे धरणक्षेत्रातील जलसाठा कमी होत असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.१७८ गावांमध्ये पाणी टंचाईजिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात यावर्षी जिल्हाभरात ४४३ गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तविली आहे. त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या दरम्यान ६३ गावांमध्ये तर जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे. तर एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत २०२ गावांमध्ये पाणी टंचाई असणार आहे. सद्यस्थितीला अमळनेर तालुक्यात ४८, भडगाव ४, बोदवड १२, चाळीसगाव ९, चोपडा २५, धरणगाव २३, एरंडोल १६, जळगाव ३, जामनेर १२, मुक्ताईनगर ७, पारोळा १७, रावेर २ अशी गावनिहाय पाणी टंचाईची स्थिती राहणार आहे.७ कोटी ३५ लाखांची उपाययोजनाजिल्ह्यातील ४४३ गावांमधील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ३५ लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात विहिर खोलीकरणासाठी १३ लाख १० हजार, शेवड्या घेण्यासाठी ३ लाख ६० हजार, खाजगी विहिर अधिग्रहणासाठी १ कोटी ११ लाख, टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी ७८ लाख, नवीन विंधन विहिर तसेच कुपनलिका ताब्यात घेण्यासाठी एक कोटी ८१ लाख ३ हजार, नळ योजना दुरुस्त करण्यासाठी १ कोटी ८२ लाख, तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ६५ लाख विंधन विहिर दुरुस्तीसाठी ५० हजार अशा उपाययोजनांचा समावेश आहे.६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. सद्यस्थितीला ६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील टँकरची संख्या ही ४३ पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यातील १७८ गावांना पाणी टंचाईच्या झळा
By admin | Published: February 21, 2017 4:40 PM