लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणात अटक आरोपींपैकी पोलीस शिपाई आरती शिंगणे ही घटनेच्या चार दिवसांपूर्वीच कामाला लागली होती. विशेष म्हणजे प्रशिक्षण घेतल्यानंतर ही तिची पहिलीच पोस्टिंग होती. कामाच्या अवघ्या चौथ्या दिवशीच तिला कोठडीची हवा खावी लागल्याचे समोर येत आहे. घाटकोपर परिसरात आरती ही आई-वडिलांसोबत राहते. पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची नेमणूक भायखळा कारागृहात पोलीस शिपाई म्हणून करण्यात आली. वॉर्डन मंजुळा शेट्येला मारहाण झाली तेव्हा तिला कामावर रुजू होऊन अवघे चार दिवस झाले होते. पोलीस खात्यात येऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या आरतीला कामाच्या सुरुवातीलाच कोठडीची हवा खाण्याचे दिवस ओढावले. तिचे लग्नही ठरले आहे. पाच महिन्यांनंतर तिचा विवाह होणार आहे. नवरा मुलगाही पोलीस खात्यात असल्याची माहिती समजते. मंजुळाच्या मारहाणीत तिचाही सहभाग आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. तसेच भायखळा जेल वसाहतीत राहत असलेली जेलर मनीषा पोखरकर (२९) गेल्या दोन वर्षांपासून भायखळा कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून काम करते. तिला १४ महिन्यांचे मूल आहे. तर पोलीस शिपाई वसीमा शेख आणि शीतल शेगावकरही याच वसाहतीत राहतात. वसीमाला चार मुले आहेत तर शीतलला दोन जुळ्या बाळांसह सहा वर्षांचा मुलगा आहे. तर बिंदू आणि सुरेखाचेही नुकतेच लग्न झाले होते. या सहाही संशयित आरोपींकडे गुन्हे शाखेचे तपास पथक अधिक चौकशी करत आहे. मात्र त्यांच्या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबाचीही फरफट होताना दिसते आहे.एसआयटीचा अहवालच अंतिम...राज्य महिला आयोगाने कारागृहाच्या वतीने पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र त्यांनी महाराष्ट्र कारागृहाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आरोपी अधिकाऱ्यांना दर्शविलेल्या पाठिंब्याबाबतचा स्नॅप शॉट, त्यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे त्यांच्या तपासावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत चौकशीही सुरू करण्यात आल्याचे समजते. याबाबत राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे विचारणा केली असता, मंजुळाच्या हत्येप्रकरणी तिघांची एसआयटी अधिक चौकशी करत आहे. बुधवारी त्यांची पहिली बैठकही पार पडली. तसेच स्वाती साठेबाबत कुठलीही तक्रार आतापर्यंत आपल्याकडे आलेली नाही. त्यांच्या व्हॉट्सअॅप आणि आरोपींना सहकार्य करण्याबाबतही काही संबंध असला किंवा नसला तरी एसआयटीच्या चौकशीत जे समोर येईल तोच अंतिम अहवाल गृहीत धरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज न्यायालयातसहाही संशयित आरोपींना ७ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली होती. त्यांच्या वाढीव कोठडीसाठी शुक्रवारी त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
कामाची सुरुवातच कोठडीतून
By admin | Published: July 07, 2017 4:39 AM