पुणे : रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी नागरिक बघ्याची भूमिका घेताना दिसतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा व्यक्तींना वाटणारी कोर्ट कचे-यांची व पोलिसांकडून दिल्या जाणा-या त्रासाची भीती. त्या अपघातग्रस्त व्यक्तीला जर वेळीच उपचार मिळाले तर त्याचे प्राण नक्कीच वाचू शकतात. यासाठी महाराष्ट्र आथोर्पेडिक असोसिएशन (एमओए) तर्फे 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान '' रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात'' या शीर्षकाखाली विविध ठिकाणी जागरूकता प्रशि़क्षण उपक्रम राबिवले जाणार आहेत. महाराष्ट्र अथोर्पेडिक डे निमित्त हे उपक्रम प्रि-हॉस्पिटल ट्रॉमा केअर (अपघातग्रस्त व्यक्तीला रूग्णालयात दाखल करेपर्यंत घ्यावयाची काळजी) आणि नागरिकांचा सहभाग यावर केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती एमओए चे माजी अध्यक्ष डॉ.पराग संचेती, एमओए चे सदस्य डॉ.चंद्रशेखर साठ्ये,सदस्य डॉ.गोवर्धन इंगळे आणि पीओएसचे सचिव डॉ.संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.एखाद्याचा दुदेर्वाने जर कुठे अपघात झाला तर आजही लोक मदतीचा हात पुढे करायला धास्तावतात. पण हा भीतीचा दृष्टीकोन काढून टाकणे गरजेचे आहे. अपघात झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलला दाखल करण्यापूर्वी मदत करून कशी काळजी घ्यावी याची माहिती आठवडाभर चालणा-या या उपक्रमांद्वारे दिली जाणार आहे. लोकांनी अशा प्रसंगी अधिक संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे करावा हे या उपक्रमांमागचा हेतू आहे. या उपक्रमांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम,शिबिरे,पथनाट्य व चित्रफितींचा समावेश असेल.डॅ.पराग संचेती म्हणाले, रस्त्यावरील अपघातात जमलेल्या गर्दीपैकी बघ्या व्यक्तींनी नुसतेच बघत न राहाता जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली पाहिजे. मात्र त्यासाठी अशा घटनांच्या वेळी सर्वप्रथम कोणती कृती करायला पाहिजे याची माहिती असणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी पुढाकार घेणा-या व्यक्तीलाच केसमध्ये अडकविण्याची भीती असते त्यामुळे सामान्य व्यक्ती मदतीसाठी पुढे येत नाहीत. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून जाणा-या व्यक्तीला ( गुड समरिटान) स्वत:चे नाव व पत्ता पोलिसांनी सांगणे बंधनकारक नाही. पोलीस अशा गुड समरिटानला अपघाताचा साक्षीदार बनण्याची सक्ती करू शकत नाही. तसेच त्याचा जबाब घेण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावू शकत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी थांबा. तुमच्या मदतीने कुणाचे तरी प्राण वाचू शकणार आहेत. यासाठी हा जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे.............*अपघातग्रस्त व्यक्तीचा श्वास चालू आहे याची खात्री करून घ्या. श्वासातून घरघर येत असेल तर अशा व्यक्तीचा खालचा जबडा ( हनुवटी) हाताच्या बोटांनी उचल्यास श्वासमार्ग मोकळा होण्यास मदत होते.बेशुद्ध व्यक्तीत जीभेचा मागचा भाग घशामध्ये पडून- अडकून श्वासमार्ग बंद पडतो त्यामुळे ती व्यक्ती अपघातातील जखमांमुळे मृत्यू न पावता श्वास बंद पडल्यामुळे मृत्यू पावते. * अपघातग्रस्त व्यक्तीच्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव थांबवा. कधीकधी अपघातात अति रक्तस्त्रावामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अपघात स्थळी रक्तस्त्राव थांबण्यासाठी जखमेवर हाताने दबाव द्या अथवा जखमेभोवती घट्ट फडके किंवा बँडेज गुंडाळा. या दोन सोप्या कृतीने जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबू शकतो. * अपघातग्रस्त व्यक्तीचे हात/पाय मोडले असतील व वेडेवाकडे झाले असतील तर त्यांना आधार द्या. अशा फँक्चर झालेल्या हातापायांना रूग्णाला फार न दुखावता जेवढे जमेल तेवढे सरळ करा व त्यांना सहज उपलब्ध कडक वस्तुंचा ( कार्डबोर्ड, काठ्या, छत्री) आधार द्या. * जखमी व्यक्ती जर श्वास घेत असेल पण प्रतिसाद देत नसेल ( शुद्धधीवर नसेल) तर अशा व्यक्तीला कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवल्यास अशा व्यक्तीचा श्वासमार्ग मोकळा राहातो.
अपघात घडल्यास या क्रमांकावर संपर्क साधापोलीस (100)अँम्ब्युलन्स ( 108)एकात्मिक आपत्कालीन ( 112)