मुंबई : ‘नट जेव्हा व्यक्तिरेखा साकारतो त्या वेळी तो एक माणूस म्हणूनही घडत असतो. मी ‘चौकटराजा’, ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील गांधी अशा व्यक्तिरेखा तटस्थपणे साकारल्या. मात्र माझ्यात करुणा, सहिष्णुता, अहिंसा अशा विचारांची मूल्ये रूजली गेली. अशा व्यक्तिरेखांमुळे उत्कट अनुभूती येते,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते. प्रभावळकर यांना नाट्य व चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ सेवेबद्दल ‘मा. दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.या सोहळ््यात अनिल कपूर (प्रदीर्घ हिंदी चित्रपटसेवा - मा. दीनानाथ विशेष पुरस्कार), कुमार केतकर (प्रदीर्घ पत्रकारिता - मा. दीनानाथ पुरस्कार), पं. सुरेश तळवलकर (प्रदीर्घ संगीत सेवा - मा. दीनानाथ पुरस्कार), भालचंद्र नेमाडे (प्रदीर्घ साहित्यसेवा - वाग्विलासिनी पुरस्कार), अपर्णा अभ्यंकर (आदिशक्ती पुरस्कार), मंडणगड येथील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाच्या आशा कामत (समाजसेवा - आनंदमयी पुरस्कार) आणि अशोक नारकर यांच्या अमृता प्रॉडक्शन्स निर्मित ‘त्या तिघांची गोष्ट’ हे नाटक (नाट्यसेवा - मोहन वाघ पुरस्कार) यांनाही गौरविण्यात आले.या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना पं. सुरेश तळवलकर म्हणाले, ‘माझे पहिले गुरु पंढरीनाथ नागेशकर हे घरातून पळाले ते तडक बळवंत नाटक कंपनीत गेले होते. तेव्हा त्यांना प्रथम मार्गदर्शन मिळाले होते ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे. आज हा पुरस्कार म्हणजे माझ्या गुरुकडून मिळालेले दीनानाथांचे आशीर्वाद मिळाले आहेत’.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या कार्यक्रमास दीड तास उशिरा पोहोचले. ठाण्यातील ट्रॅफिकमध्ये अडकल्याने उशीर झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
व्यक्तिरेखा साकारताना माणूस म्हणून घडलो - प्रभावळकर
By admin | Published: April 25, 2015 4:08 AM