बेलापूर (अहमदनगर) : काही वर्षांपूर्वी जम्मू- काश्मीर येथील गौरी शर्माच्या पुनर्जन्माच्या कथेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरगाव चांगलेच चर्चेत आले होते़ आता पुन्हा एकदा गुजरात राज्यातील पटेल आडनावाच्या दाम्पत्याने आमचा बेलापूरमध्ये १९६९ मध्ये खून झाला होता, असा दावा केला आहे.शुक्रवारी गावात येऊन त्यांनी चौकशी केल्याने बेलापूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गौरी शर्माच्या पुनर्जन्माचे वृत्त दाखविण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्या चढाओढ करीत असल्याचे सगळ््यांनीच पाहिले. शुक्रवारी सकाळीच बेलापूर गावात सुरत (गुजरात) येथील विजया व सूरज पटेल हे दाखल झाले. त्यांनी गावात संभूज पाटील नावाची व्यक्ती कोठे राहते, याची चौकशी केली. संबंधित व्यक्तीचा पत्ता न सापडल्यामुळे पटेल दाम्पत्यास बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले. संबंधित व्यक्तीचे घर शोधण्याचे प्रयोजन काय असे विचारले असता, त्यांनी पुनर्जन्माचे कथन केले. १९६९ साली संभूज पाटील त्यांची पत्नी व मुलगा हे कामानिमित्त बेलापूर गावी आले होते. या गावात तिघांचीही हत्या झाली. हत्या झालेले पती-पत्नी आम्हीच असल्याचा दावा पटेल दाम्पत्यांनी सरपंच भरत साळुंके, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, अशोक गवते, कचरू वाबळे, प्रकाश जाजू, त्रिंबक कुर्हे या ग्रामस्थांसमोर केला. त्यामुळे गावकरीही चक्रावले. १९६९ मध्ये गावात तिहेरी खुनाची कुठलीही घटना घडली नसल्याचे सर्वांनी ठामपणे सांगितले. जुन्या जाणत्या गावकऱ्यांकडेही चौकशी केली. उपरोक्त काही नसल्याचे गावकऱ्यांनी पटेल यांना सांगितले. अकोले तालुक्यात बेलापूर बदगी हे गाव असल्याचे पटेल यांना सांगण्यात आले. त्यामुळे हे दाम्पत्य बेलापूर बदगीकडे रवाना झाले. पूनर्जन्माच्या चर्चेने गावात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)
पूनर्जन्माच्या दाव्याने बेलापूर पुन्हा चर्चेत
By admin | Published: November 05, 2016 4:01 AM