बेळगाव : महापालिकेवर पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकला असून किरण सायनाक व मीना वाझ महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. मराठी उमेदवारांनी प्रतिस्पर्धी कन्नड गटातील उमेदवार रमेश सोनटक्की आणि सरला हेरेकर यांचा ५ मतांच्या फरकाने पराभव केला.महापौर पदासाठी मराठी गटातर्फे सायनाक, मोहन बेळगुंदकर आणि विनायक गुंजटकर यांनी, तर कन्नड गटातर्फे रमेश सोनटक्की व दीपक जमखंडी यांनी, तसेच उपमहापौरपदासाठी मराठी गटातून माया कडोलकर, वाझ तर कन्नड गटातून हेरेकर, पुष्पा पर्वतराव व जयश्री माळगी यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, नियोजित वेळेत मराठी गटातून सायनाक आणि वाझ तर कन्नड गटातून सोनटक्की, हेरेकर वगळता सर्वांनी माघार घेतली. सायनाक आणि वाझ यांना ३२, तर कन्नड गटातील सोनटक्की, हेरेकर यांना २७ मते मिळाली. बेळगाव पालिकेतील ५८ नगरसेवक आणि २ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार संभाजी पाटील यांनी नगरसेवक व आमदार असा एकच मतदानाचा हक्क बजावला. मराठी गटाचे संख्याबळ ३२ असल्याने मतदानाचा अधिकार असूनही कन्नड भाषिक महापौर होत नाही, हे लक्षात घेऊन खा. सुरेश अंगडी, प्रकाश हुक्केरी, आ. संजय पाटील आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी गैरहजर राहिले. मराठी गटातून महापौरपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने कन्नड गटाने मराठी गट फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेवकांच्या अभेद्य एकीमुळे पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर मराठी भाषिक महापौर, उपमहापौर विराजमान झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तर कर्नाटक प्रादेशिक आयुक्त एम. एम. मंजुनाथ यांनी महापौर निवडीची माहिती पत्रकारांना दिली. गेले वर्षभर मराठी भाषिक नगरसेवकांची सत्ता असतानाही पालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव मांडला नव्हता. बेळगावचे नामकरण बेळगावी झाले असले तरी सभागृहात नगरसेवकांकडून मराठी अस्मिता दाखवली नव्हती. कायद्याच्या चौकटीतून कर्नाटक सरकारशी आपण भांडू, असे आश्वासन नूतन महापौर सायनाक यांनी दिले. (प्रतिनिधी)सायनाक २५वे महापौर १९८४ मध्ये बेळगाव महापालिका अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंतच्या २५ महापौरांपैकी २१ महापौर मराठी भाषिक, तर केवळ ४ कन्नड भाषिक महापौर झाले आहेत.
बेळगाव महापालिकेवर मराठीचा झेंडा फडकला
By admin | Published: March 08, 2015 2:13 AM