बेळगाव : केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना केंद्राने कर्नाटक सरकारच्या बेळगावी नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आगामी १ नोव्हेंबरपासून बेळगाव शहराचा बेळगावी असा कन्नड भाषेच्या शब्दावरून उच्चार करण्यात येणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या राजपत्रात बेळगावी अशी नोंद करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मराठी भाषकांनी केंद्र व कर्नाटक सरकारच्या निर्णयास विरोध दर्शविला. मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी एकीकरण समितीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ (प्रतिनिधी)
‘बेळगावी’ नको, ‘बेळगाव’च पाहिजे !
By admin | Published: October 21, 2014 5:49 AM