बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये आयोजित केलेल्या महामेळाव्यात भाषण केल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. मुंडे यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या मागणीसाठी सोमवारी बेळगावात एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळाव्यासाठी मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. पोलिसांना गुंगारा देत मुंडे यांनी रविवारी रात्रीच बेळगाव गाठले आणि संमेलनात जोरदार भाषणही दिले. मुंडे यांच्या या भाषणामुळे कर्नाटक सरकारचा चांगलाच तीळपापड झाला आहे.बेळगाव सीमाभागातील आपल्या मराठी बांधवांसाठी असे एक नाही तर ५६ गुन्हे दाखल झाले तरी आपण त्याला भीत नाही. त्यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन.- धनंजय मुंडे,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते.
धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 1:56 AM