बेळगाव : येथील गांधीनगरमध्ये रविवारी रात्री झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी ५५ जणांना अटक केली. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून हिंसाचार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोमवारी दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता होती.रविवारी रात्री दंगलखोरांनी तुफान दगडफेक केली होती. जमावाने ३० पेक्षा जास्त दुचाकी व चारचाकी वाहने व काही घरांची तोडफोड केली होती. हल्लेखोरांनी पोलिसांचे एक वाहनही पेटविले. दगडफेकीत २० जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एक पोलीस अधिकारी, सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या आठ नळकांड्या फोडाव्या लागल्या; पण तरीही जमाव नियत्रंणात न आल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर जमाव पांगला. रविवारी दुपारी कन्नड, मराठी आणि उर्दू शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. त्यास एका व्यक्तीने हरकत घेतली. त्याला दुसऱ्या गटाच्या पालकांनी विरोध केला. नंतर इतरांनी हस्तक्षेप करून प्रकरण मिटविले. क्रिकेट खेळताना पुन्हा दोन संघात वाद झाला. नंतर मैदान रिकामे करण्याची मागणी झाली. त्यास दुसऱ्या गटाने हरकत घेतली. त्यातून दोन्ही गटात वादावादी झाल्या. मैदानावरील वादाने रात्री हिंसक वळण घेतले. एका गटाच्या जमावाने मुलांना मैदानावर खेळू दिले नाही म्हणून दुर्गामाता रोडवरील वाहनांची मोडतोड, जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्याला स्थानिक रहिवाशांकडून प्रतिकार झाला. (प्रतिनिधी)
बेळगावात दंगल; ५५ जणांना अटक
By admin | Published: July 14, 2015 12:38 AM