मुंबई - गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. मात्र, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौऱ्यावरुन सुरू असलेल्या चर्चांबाबत भाष्य केले आहे.
बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही. या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळवलं आहे. या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असे स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिले आहे. ते म्हणाले, 6 तारखेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा दौरा 6 तारखेला निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत हे कर्नाटक सरकारला कळवलं आहे. सविस्तर दौरा कळवलेला नाही. या घटकेला आम्ही दौरा रद्द केल्याबाबत अधिकृत कळवलेलं नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार अंतिम निर्णय घेऊ, असे शंभूराज देसाई म्हणाले.
याचबरोबर, आपले मंत्री घाबरले आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्या आरोपांना उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, "मंत्री बिलकुल घाबरत नाही. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकतो. पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे. समन्वयातून यामधून तोडगा काढायचा आहे. हे प्रकरण चिघळू न देता, केंद्राने याच मध्यस्थी करावी आणि समन्वयातून दोन्ही राज्यांमधील हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. कायदा हातात घेऊन आम्हाला हे प्रकरण चिघळवायचं नाही. मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्या नागरिकांची जी भावना आहे, त्या भावनेच्या पाठिशी आम्ही आहोत."
दुसरीकडे, शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. "कबड्डीचा खेळ महाराष्ट्रात असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावे. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यावे", असे आव्हान संजय राऊत यांनी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. तसेच, "या लोकांमध्ये हिंमत नाही आहे. हतबल, लाचार लोकं असून, काही करू शकत नाहीत. फक्त बोलतात आणि आम्हाला शिव्या घालतात. त्या बोम्मईंना शिव्या घालून त्यांच्या नावाने बोंबला. शिवरायांचा इतिहास आणि बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात, घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला संरक्षण असून, जायला हवे. मात्र, मुळमुळीत धोरण असलेले हे सरकार आहे", अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.