मुंबई : इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद बेरिएट्रिक सर्जरीसाठी चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल झाली आहे. ५०० किलो वजन असलेल्या इमानचे सैफी रुग्णालयात दाखल झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांत ५० किलो वजन घटले आहे. आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे हा सकारात्मक बदल दिसून आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आता इमानला हातात वस्तू पकडणे शक्य होत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.चर्नी रोड येथील रुग्णालयात इमानसाठी तयार करण्यासाठी विशेष ‘वन बेड हॉस्पिटल’मध्ये इमानवर उपचार सुरू आहेत. इमानला केवळ द्रवरूपी आहार सुरू असल्याने तिला असलेले विविध आजार नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते आहे. सध्या दिवसाला केवळ १,२०० कॅलरीचा आहार इमान घेते आहे. तसेच, दररोज ९० मिनिटांचे फिजीओथेरपीचे सेशन सुरू असल्याची माहिती फिजीओथेरपिस्ट डॉ. स्वाती संघवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.इमानने स्वत: हालचाल करावी यासाठी डॉक्टरांची चमू प्रयत्नशील आहे. त्यात तिने स्वत: हात हलविणे, हाच उचलणे, जास्त काळ हातात एखादी वस्तू पकडणे आणि मग आधाराने स्वत: उठून बसणे अशा विविध क्रियांवर टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन आठवड्यांत इमानवर पहिली सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इमानला तीन तासांहून अधिक काळ झोपण्याची परवानगी नाही, एकूण आठ तास ती झोप घेते. या वर्षात तिचे २०० किलो वजन घटविण्याचे लक्ष्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इमानचे १२ दिवसांत ५० किलो वजन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 4:54 AM