ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - तब्बल 500 किलोहून अधिक वजनामुळे चर्चेत आलेल्या आणि सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इमान अहमद अब्दुल्लती हिचे वजन सुमारे 262 किलोंनी घटल्याची माहिती इमानवर उपचार करणारे डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांनी सांगितले. आज आयोजित करण्यात आलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात डॉ. लकडावाला यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. त्यावेळी इमानला भारतात आणण्यासाठी आणि तिच्यावर उपचार करताना आलेल्या अनुभवांबाबत बोलताना डॉ. लकडावाला यांनी ही माहिती दिली.
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात डॉ. लकडावाला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर लोकमत वृत्तसमूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी इमानवर उपचार करताना आलेल्या अनुभवांचे कथन करण्याचा आग्रह लकडावाला यांना केला.
त्यावेळी लकडावाला म्हणाले, "गेल्या वर्षी इमानवरील उपचारांसाठी तिच्या बहिणीने माझ्याकडे संपर्क साधला. त्यावेळी तिने काही इमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओसुद्धा पाठवले. ते पाहून मला तिची दया आली. त्यानंतर मी उपचार करून तिला वाचवण्याचे ठरवले. पण हे आव्हान सोपे नव्हते. जवळपास 25 वर्षे घरातून बाहेर न पडलेल्या आणि पाच फूट उंच व 4 फूट रुंदीच्या इमानला खिडक्या तोडून बाहेर आणावे लागले. तिच्या रक्तचाचण्यांचे अहवालही चिंता वाढवणारे होते. पण सुदैवाने महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पोलीस विमनतळ आणि सैफी रुग्णालयाने मदत केली. आज इमान उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्याचाच परिणाम म्हणून इमानच्या वजनात 262 किलोंनी घट झाली आहे,
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि वैद्यकीय यामधील 14 जणांना आणि स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.