मुंबई : राज्यातील भाजपा सरकार अगोदर विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेईल व त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केल्यामुळे विश्वासदर्शक ठरावापूर्वी आपल्या मंत्र्यांचा शपथविधी करण्याची मागणी लावून धरलेल्या शिवसेनेचा चांगलाच हिरमोड झाला आहे.मुख्यमंत्री म्हणाले, की शिवसेनेबरोबर मंत्रिपदाबाबतची चर्चा खेळीमेळीने दिल्लीच्या पातळीवर सुरू आहे. शिवसेनेला किती मंत्रिपदे द्यायची त्याचा निर्णय दिल्लीहून होणार आहे. शिवसेनेने यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबर चर्चा केली. गेले काही दिवस केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर शिवसेनेचे नेते चर्चा करीत आहेत. जेटली यांच्या विनंतीला मान देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ््याला हजेरी लावली होती.शिवसेनेने एकूण १० ते १२ मंत्रिपदांची मागणी केल्याचे समजते. तसेच प्रमुख दोन खाती भाजपाकडे राहिली तर एक खाते सेनेला देण्याचा त्यांचा आग्रह असल्याचे कळते. मात्र शिवसेनेने दिल्लीतील नेत्यांना काय प्रस्ताव दिला आहे ते माहीत नाही, असे महाराष्ट्रातील भाजपाचे नेते सांगत आहेत. आता तर राज्यात विश्वासदर्शक प्रस्तावाला मंजुरी देताना शिवसेनेने ठरावाच्या बाजूने मतदान केले नाही तर केंद्रातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश केला जाऊ शकतो, असे राज्यातील भाजपाचे नेते खासगीत सांगत आहेत. (विशेष प्रतिनिधी)
आधी विश्वास, मग विस्तार
By admin | Published: November 06, 2014 5:54 AM