ऑनलाइन लोमकत
मुंबई, दि. 3 - जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख घेऊन भारतात उपचारासाठी आलेली इमान अहमद आता अबुधाबीला जाणार आहे. 81 दिवसानंतर इमान भारतातून जाण्यास सज्ज झाली आहे. सैफी रुग्णालयात उपचार करण्यात आलेली इमान गुरुवारी सकाळी 10.30 वाजता अबूधाबीसाठी निघणार आहे. तिथे गेल्यानंतर तिच्यावर पुढील उपचार होणार आहेत.
इजिप्तची इमान उपचारांसाठी कार्गो विमानाने भारतात दाखल झाली होती. ५०० किलो वजन असलेल्या इमानचे उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर आताचे वजन १७६ किलो एवढे आहे. त्यामुळे आता ती सामान्य प्रवाशाप्रमाणे भविष्यातील फिजिओथेरपीच्या उपचारांसाठी विमानाच्या बिझनेस क्लासहून अबुधाबीला लवकरच रवाना होणार आहे.
इमानची प्रकृती स्थिर असल्याचे सैफी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. आता भविष्यातील मज्जासंस्था आणि फिजिओथेरपीच्या उपचारांकरिता इमान लवकरच अबुधाबीच्या बुर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे. या रुग्णायलयाविषयी इमानच्या कुटुंबियांना डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सल्ला दिला होता, अशी माहिती सैफी रुग्णालयाच्या डॉ. अर्पणा भास्कर यांनी दिली.
इमानची बहिण शायमा सेलिमने डॉक्टरांवर दुर्लक्ष केलं जात असल्याच्या आरोप केला होता. शायमाने एक व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केला होता. तसंच काही फोटो काढून इमानची परिस्थिती नाजूक असल्याचा दावा केला होता. यानंतर शायमा आणि रुग्णालय प्रशासनामध्ये एका प्रकारे शीतयुद्ध सुरु झालं होतं. 14 एप्रिल रोजी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी डॉ मुफझ्झल लकडावाला खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. डॉ लकडावाला यांनी इमानचं वजन कमी करण्याचं आणि ठणठणीत बरी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असल्याचं शायमा सेलिम बोलल्या होत्या.
डॉक्टरांनी मात्र सर्व आरोप फेटाळत पुरावे सादर करण्याचा दावा केला होता. यानंतर अबुधाबीच्या बुर्जिल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सैफी रुग्णालयाला भेट देत माहिती जाणून घेतली. सर्व वैद्यकिय अहवालांची पाहणी केल्यानंतर इमान विमानाने प्रवास करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुर्जिल रुग्णालयात मज्जासंस्था आणि फिजिओथेरपीचे उपचार पार पडणार आहेत.
सैफी रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरील 701 नंबरच्या रुममध्ये इमानची व्यवस्था करण्यात आली होती. खास इमानसाठी ही रुम बांधण्यात आली होती. आता इमान निरोप घेत असल्याने सैफी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिच्या फ्लाईंग किसेसला मिस करु असं सांगितलं आहे.