मुंबई : इजिप्तहून बेरिएट्रिक सर्जरीसाठी मुंबईत दाखल झालेली ३६ वर्षीय इमान अहमद आता स्वत: हालचाल करू लागली आहे. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात ५०० किलो वजन असलेल्या इमानवर उपचार सुरू आहेत. या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत इमानने आता हातांची हालचाल करणे सुरू केले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.सैफी रुग्णालयात इमानसाठी तयार करण्यासाठी विशेष ‘वन बेड हॉस्पिटल’मध्ये इमानवर उपचार सुरू आहेत. इमानने स्वत: हालचाल करावी यासाठी डॉक्टरांची चमू प्रयत्नशील आहे. त्यात इमानने स्वत: हात हलविणे, हाच उचलणे, जास्त काळ हातात एखादी वस्तू पकडणे आणि मग आधाराने स्वत: उठून बसणे अशा विविध क्रियांवर टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रयत्नांना काहीसे यश मिळाल्याची प्रतिक्रिया डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.इमानच्या उपचारांसाठी १३ डॉक्टरांची चमू आणि ८ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या इमानला दिवसाला केवळ १,२०० कॅलरीचा आहार देण्यात येत आहे. तसेच, दररोज ९० मिनिटांचे फिजीओथेरपीचे सेशन सुरू आहे. गेल्या २५ वर्षांनंतर इमान पहिल्यांदाच घरातून बेरिएट्रीक सर्जरीसाठी बाहेर पडली आहे. उपचार सुरू झाल्यानंतर इमानचे ३० किलो वजन घटले आहे. सध्या इमानला केवळ द्रवरूपी आहार सुरू आहे. इमानला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक आजार आहेत. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)
इमान करतेय हाताची हालचाल
By admin | Published: March 03, 2017 2:23 AM