पाईट : भलवडी (ता. खेड) येथील कोठुबाई मंदिर परिसरातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. यामुळे दुष्काळाच्या तीव्र झळा या परिसराला बसत आहे. ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला असून, छोटे पाटबंधारे विभाग मात्र काम चांगले झाल्याचे सांगत आहे. यामध्ये ग्रामस्थांना मात्र तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.येथील बंधारा सुमारे १९ लाख ८५ हजार रुपये खर्चून बांधण्यात आला. यामध्ये प्रथम जून २०१५ मध्ये प्रथम पाणी अडविण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु, ग्रामस्थांच्या मतानुसार या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याने पाणी अडलेच नाही. या वेळी ग्रामस्थांना बंधाऱ्याची दुरुस्ती करून पाणी अडविण्यात येईल, असे सांगितले. परंतु, २०१६ मध्ये बंधाऱ्यावर अलीकडे-पलीकडे येण्या-जाण्यासाठी स्लॅप टाकला. या व्यतिरिक्त कोणतेच काम केले नाही व सलग दुसऱ्या वर्षी पाणी अडविले. ग्रामस्थांना वाटले या वर्षी तरी पाणी आडेल, परंतु पाणी याही वर्षी अडले नाही. यामुळे या परिसरात या बंधाऱ्याचा कोणताही उद्देश पूर्ण झाला नसल्याचा प्रामस्थांनी अरोप केला आहे. याबाबत ग्रामस्थ वारंवार तक्रारी करुनही उपयोग न होता, उलट ग्रामपंचायतीकडे काम पूर्णत्वाचा दाखला मागण्यात येत आहे. परंतु काम निकृष्ट झाल्याने ग्रामपंचायत सदर दाखला देत नाही. बंधाऱ्याबाबत छोटे पाटबंधारे विभाग व ग्रामस्थ परस्परांविरोधी बोलत असले, तरी प्रत्यक्षात परिसराची स्थिती अत्यंत भीषण असून येथील ग्रामस्थांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)तलावाचे काम निकृष्ट झाले आहे. बंधाऱ्यामध्ये पाणी साचत नसल्याने काम पूर्णत्वाचा दाखला व बंधारा ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यासाठी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीने ते स्वीकारले नाही.देवराम सावंत, सरपंच, भलवडी>तलावाचे काम योग्य पद्धतीने झाले आहे. साचलेले पाणी आसपास शेतकरी असल्याने बंधाऱ्यात पाणी अडून राहत नाही.- बी. बी. पडवळ, शाखा अभियंता
भलवडी बंधारा पडला कोरडा
By admin | Published: March 07, 2017 1:29 AM