पुणे : इंदिरा आवास योजनेचे नाव आता पंतप्रधान आवास (ग्राम) योजना असे करण्यात आले असून, यासाठीचे लाभार्थीही आता २०११ च्या सर्वेक्षणानुसारच निवडण्याचे शासनाने ठरविले आहे. यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील १० ग्रामपंचायतींत बुधवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील हवेली व खेड तालुक्यांत या सभा झाल्या.२००२ ते २००७ या वर्षांत दारिद्र्यरेषेखालील यादी तयार करण्यात आली होती. या यादीच्या आधारे शासनाच्या योजनांचा लाभ आजपर्यंत लाभार्थींना दिला जात आहे. सुमारे १२ वर्षांपूर्वी केलेल्या यादीवर लाभार्थींची निवड केली जात आहे. त्यामुळे शासनाने २०११ मध्ये नव्याने सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण केले. पुणे जिल्ह्यात तो सर्व्हे जानेवारी २०१६ मध्ये अंतिम झाला. आता ‘पंतप्रधान आवास’साठी लाभार्थी निवडही २०११ च्या सर्वेक्षणानुसारच करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राज्य पंतप्रधान आवासच्या अधिकाऱ्यांनी राज्यात सर्व जिल्ह्यांत जाऊन कार्यशाळाही घेतल्या आहेत. बुधवारी राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील १० ग्रामपंचायतींत पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभार्थी निवडीसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील हवेली व खेड तालुक्यांची यात निवड झाली होती. हवेलीतील सोरतापवाडी, शिंदवणे, थेऊर, कोलवडी व खामगाव मावळ व खेडमधील पाळू, चास, धानोरे, दावडी व संतोषनगर या दहा ग्रामपंचायतींत या ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभेत २०११ च्या सर्वेक्षणानुसार शासनाचे १४ निकष वगळून, जे लाभार्थी बसले, त्यांच्या नावांचे ग्रामसभेत जाहीर वाचन करण्यात आले. या ग्रामसभेत लाभार्थी निवडताना काय अडचणी येतात, याचा आढावा घेऊन सामाजिकरण आर्थिक जातनिहाय सर्वेक्षणाचा सुधारित आढावा शासन जाहीर करणार आहे. (प्रतिनिधी)
नवीन सर्वेक्षणानुसार ठरविणार ‘पंतप्रधान आवास’चे लाभार्थी
By admin | Published: May 19, 2016 1:48 AM