मुंबई : घोटाळेबाजांना हद्दपार करण्यासाठी एकीकडे कारवाई सुरू असताना महापालिका अभियंत्यांनी ठेकेदारांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे़ याची गंभीर दखल घेऊन संबंधित अभियंत्यांना निलंबित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे़ मात्र, नियमांमध्येच अशी तरतूद असल्याने, ही दंडवसुली ठेकेदार आणि अभियंत्यांचीही तारणहार ठरणार आहे़३४ रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता असल्याचे चौकशीतून उजेडात आल्यानंतर पालिकेने सहा ठेकेदारांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली़ मात्र, फौजदारी गुन्हा दाखल असताना, या ठेकेदारांकडून पाच कार्यकारी अभियंत्यांनी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना दंड वसूल केला आहे़ अभियंत्यांच्या या प्रतापामुळे ठेकेदारांवरील कारवाई कमकुवत झाली आहे़ ही कारवाई सुरू असताना या कार्यकारी अभियंत्यांनी न केलेल्या कामांचे बिल वटविल्याप्रकरणी ठेकेदारांकडून तीन कोटींचा दंड वसूल केला़ या कारवाईमुळे दोन ठेकेदारांना उच्च न्यायालयातून जामीन मिळवण्यात यश आले आहे़ याची गंभीर दखल घेऊन, या अभियंत्यांकडून आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारपर्यंत खुलासा मागविला आहे़ त्यांच्या निलंबनाचेही संकेत आहेत़ (प्रतिनिधी)नियमांचा ठेकेदारांना फायदाकरारातील सर्वसाधारण अटींमध्ये नियम क्रमांक ६९ आणि ८७ अनुसार ठेकेदारांनी केलेले निकृष्ट दर्जाचे काम चांगले करून घेणे आणि जादा दिलेली रक्कम दंडासह वसूल करण्याची मुभा आहे़ या नियमाप्रमाणे दंड वसूल झाला असल्याचा युक्तिवाद आता अभियंता करत आहेत़ त्यामुळेच ठेकेदारांना जामीन मिळाली असून, यापुढेही त्यांच्यावरील कारवाई शिथिल होण्याची शक्यता आहे़ अभियंता स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीतघोटाळा उघड झाल्यामुळे रस्ते विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ त्यामुळे एके काळी मलाईदार मानल्या जाणाऱ्या या विभागात काम करण्यास आता अभियंता इच्छुक नाही़ विशेष म्हणजे, या विभागाचे प्रमुख अभियंताही स्वेच्छा निवृत्तीच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजते़
नियमांमधील पळवाटांचा ठेकेदारांना फायदा
By admin | Published: July 17, 2016 5:22 AM