ओमप्रकाश देवकर/ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 15 - विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न रहावा, या उद्देशाने मेहकर तालुक्यातील पाचला येथील विद्यामंदिराच्या शाळेतील तीन शिक्षकांनी पैनगंगा नदीवर विद्यार्थ्यांसाठी चक्क लोखंडी पूल बांधला. दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात पूर परिस्थितीवर मात करीत विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी हा पुल फायदेशीर ठरत आहे. बेरार अॅक्टनुसार १९३९ ला स्थापन झालेली पाचला येथील विद्यामंदिर शाळा असून, येथे सातवीपर्यंत शाळा आहे. या गावाला लागूनच बाऱ्हई व रायपूर हेखेडे जोडल्या गेले आहेत. बाऱ्हई व रायपूर येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पाचल्याला येतात. याच पाचला गावाला लागून पैनगंगा नदीचे पात्र आहे.
पावसाळ्यात नदीला पूर आला आणि हिवाळ्यामध्ये कट्ट्यात पाणी साठविल्या गेले, तर बाऱ्हई येथून येणाऱ्या विद्यार्थ्याला पाचला येथे येणारा रस्ता बंद होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. हीच बाब हेरुन व शाळेची पटसंख्या कशी कायम राहील, यासाठी येथील मुख्याध्यापक गंगाधर निकस,सहाय्यक शिक्षक प्रकाश सोळंकी व रमेश मानघाले यांनी सदर बाबीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान या शिक्षकांनी पावसाळ्याच्या दिवसात पूर परिस्थितीवर मात करुन विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे सोयीस्कर व्हावे, यासाठी त्यांनी पैनगंगा नदीवर चक्क ११० फूट लांब, ३ फूट रुंद लोखंडी पूलच बांधला. या बाबीचे गावकऱ्यांना गांभीर्य कळाले नाही.
मात्र आज पावसाळ्याच्या दिवसात ज्यावेळेस विद्यार्थी नदीमध्ये पाणी असताना या पुलावरुन शाळेत जाऊ लागले. या तीन शिक्षकांनी स्वनिधी जमवून जवळपास दिड लाख रुपये खर्च करुन सन २०१३-१४ मध्ये या लोखंडी पुलाचे काम पूर्ण केले. आजही पैनगंगा नदीच्या पात्रात पाणी असल्यास विद्यार्थ्यांसह गावकरी सुद्धा या लोखंडी पुलाचा वापर करीत आहे.