विश्वास मोरे/ऑनलाइन लोकमतपिंपरी-चिंचवड, दि. 1- बेस्ट सिटी, स्वच्छ सिटीनंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता लवकरच हगणदरीमुक्त शहर अशीही होणार आहे. येत्या मार्चपर्यंत ११ हजार ६८४ कुटुंबांसाठी स्वच्छतागृह उभारून उद्योगनगरी हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प आहे. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबिले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही मोहीम राबविली जात आहे. वैयक्तिक घरगुती स्वच्छतागृह उभारण्यासाठी योजना असून, पात्र लाभार्थींना केंद्र शासनाकडून चार, राज्य शासनाकडून ८ व पालिकेकडून चार असे एकूण १६ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महापालिका हद्दीत झोपडपट्ट्यांची संख्या ३७ घोषित आणि ३४ अघोषित अशी एकूण ७१ आहे; तर झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे तीन लाख लोक वास्तव्यास आहेत. अशा झोपड्यांतील नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतही अनेक झोपड्यांमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आहे. झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती चांगली नसल्याने किंवा स्थापत्य आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीने संबंधित स्वच्छतागृहे वापराअभावी ती पडून असल्याने झोपडपट्ट्यांबाहेरील रस्त्यावरच नागरिक प्रातर्विधीसाठी बसतात. त्यामुळे शहरातील सर्र्वेक्षण महापालिकेने केले होते. त्यात एकूण ११ हजार ६४८ कुटुंबे वैयक्तिक स्वच्छतागृहे नसल्याचे आढळून आले. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ६४ प्रभागांपैकी १९ प्रभाग हगणदरीमुक्त केले आहेत.उर्वरित प्रभाग मार्चपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार चौकाचौकांत फ्लेक्स उभारणे, जनजागृती मोहीम राबविणे, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई आणि फ अशा सहा प्रभागांत एकूण ६८८५ अर्जांपैकी ४५६९ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यांपैकी ४९९ अर्ज नामंजूर करण्यात आले, तर ४३८२ अर्ज मंजूर करण्यात आले. त्यांपैकी ३५२४ जणांचे स्वच्छतागृहांची छायाचित्रे अपलोड करण्यात आली. त्यांपैकी ४०९७ जणांना पहिला आणि २३५४ जणांना अनुदानाचा दुसरा हप्ता जमा केला आहे. सर्वाधिक अर्ज ब आणि क प्रभागातून आले होते. त्यांना अनुदान देऊन वैयक्तिक स्वच्छतागृहांची निर्मिती केली आहे. स्वच्छतेसाठी सुमारे आठ कोटी निधीस्वच्छ भारत अभियानाचा कक्षही महापालिकेत स्थापन केला आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून वैयक्तिक स्वच्छतागृहासाठी २ कोटी ४४ लाख, राज्य शासनाकडून चार कोटी ८९ लाख, सामुदायिक स्वच्छतागृहासाठी ३४ लाख ६७ हजार, राज्य शासनाकडून ११ लाख, क्षमता बांधणीसाठी दीड लाख केंद्राकडून आणि पन्नास हजार राज्य शासनाकडून मंजूर झाले आहेत. स्वच्छसाठी केंद्र शासनाकडून एकूण तीन कोटी, राज्य शासनाकडून पाच कोटी असा एकूण सात कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.केंद्र सरकारने देशातील सर्व शहरांतील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगले आरोग्य मिळावे याकरिता स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. गतवर्षी स्वच्छतेबाबत झालेल्या पाहणीत शहराला देशात नववा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळाला होता. स्वच्छ उपक्रमाचाच पुढील भाग म्हणजे हगणदरीमुक्त पिंपरी-चिंचवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शहरातील सुमारे पावणेबारा हजार कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबविली आहे. त्यापैकी ७५ टक्के काम पूर्णत्वास आले असून, उर्वरित काम मार्चपर्यंत पूर्ण करून हगणदरीमुक्त शहर करणार आहोत.- दिलीप गावडे, सह आयुक्त, स्वच्छ भारत अभियान प्रमुख
बेस्ट सिटी होणार हगणदारीमुक्त शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2017 10:02 PM