- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - पांढरा हत्ती ठरल्यानंतरही त्याला पोसण्याची बेस्ट उपक्रमाची जुनी हौस फिटलेली नाही. वातानुकूलित बसप्रमाणेच तिकिट मशीनबाबतही हाच कित्ता गिरवण्यात येत आहे. अनेक तक्रारींनंतरही ट्रायमेक्स या कंपनीला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ आज देण्यात आली. विशेष म्हणजे या कंपनीचे कंत्राट ३१ ऑगस्ट रोजी संपणार याची पूर्वकल्पना असतानाही अन्य पर्यायासाठी बेस्टने वेळकाढू धोरण अवलंबित या कंपनीवरच मेहेरनजर दाखविली आहे.
बसगाड्यांमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकिटांची छपाई करणारी मशीन ट्रायमेक्स या कंपनीमार्फत पुरविण्यात येते. प्रती तिकिट दहा पैसे या कंपनीला देण्यात येतात. मात्र मशीनमध्येच बंद पडणे, एकाचवेळी दोन तिकिटं बाहेर पडणे, मशीनमध्ये तिकिट अडकणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याचा भुर्दंड नाहक बस वाहकांना बसत होता. तरीही या कंपनीवर बेस्ट प्रशासनाने आपली कृपा कायम ठेवली, असा आरोप काँग्रेसचे रवी राजा यांनी केला. या मशीनमुळे बेस्ट वाहकांची प्रचंड अडचण होत होती. एका तिकिटसाठी बराच वेळ लागत असल्याने खच्चून भरलेल्या बसमध्ये प्रत्येक प्रवाशाकडे पोहोचणे अवघड होत आहे. अनेकवेळा वाहकांना आपल्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पाच वर्षांचे कंत्राट या कंपनीला देण्यात आल्याच्या सबबीखाली बेस्टने वेळ काढला. मात्र आता कंत्राट संपल्यानंतरही नवीन कंपनी बेस्टने नेमलेली नाही. याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले.
अन्यथा तिकिटं बंद झाले असते
ट्रायमेक्स कंपनीला मुदतवाढ देणे हा आपला नाईलाज असून नवीन कंपनीला आणण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बेस्ट समितीला दिली़