मुंबई : वैद्यकीय विमा योजना लागू करण्यास बेस्ट वर्कर्स युनियनने विरोध केल्यामुळे बेस्टमधील कर्मचारी, कामगार व त्यांचे कुटुंबीय वैद्यकीय विमा संरक्षणापासून वंचित आहेत. मान्यताप्राप्त युनियनच्या नकारामुळे ही योजना राबविणे शक्य झाले नाही, अशी माहिती देत कर्मचारी संघटनेलाच बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी जबाबदार धरले.पालिकेच्या आणि राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये कर्मचारी घेत असलेल्या औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी बेस्ट उपक्रमाकडून दरवर्षी अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जातात. बेस्ट उपक्रम आणि मान्यताप्राप्त संघटनेत झालेल्या करारानुसार दरमहा प्रदान करण्यात आलेल्या वैद्यकीय भत्त्यामध्ये १ एप्रिल २०१०पासून वाढ करून तो भत्ता प्रतिमहिना ५०० रुपये करण्यात आला. त्यामुळे बेस्टला प्रतिवर्षी अंदाजे २६ कोटी इतका आर्थिक भार सोसावा लागतो.बेस्टने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी वैद्यकीय विभागातर्फे विमा उतरविण्याचा निर्णय घेतला. परंतु मान्यताप्राप्त कामगार संघटनांकडून प्रस्तावित योजनेत काही अटी घालण्यात आल्या. विद्यमान वैद्यकीय खचार्साठी, वैद्यकीय भत्त्यापोटी दरवर्षी अंदाजे २९.५० कोटी आर्थिक भार पेलत वैद्यकीय विमा योजना चालू करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
बेस्ट कर्मचारी वैद्यकीय विमा योजनेपासून वंचित
By admin | Published: September 19, 2016 5:27 AM