लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्टनेच आता पावले उचलली आहेत. त्यानुसार नफ्यात असलेल्या विद्युत पुरवठा विभागाचे नुकसान रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार वीजचोरांवर धाडसत्र सुरू करण्यात आले असून शुक्रवारी रात्री माझगाव येथील कंपनीवर कारवाई करण्यात आली. तब्बल दहा कोटींची वीजचोरी या कंपनीने केली असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी बॉम्बे टी स्ट्रेनर मॅन्युफॅक् ारिंग कंपनीचे मालक मिकादार रतलामवाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेस्ट उपक्रमामार्फत कुलाबा ते सायन आणि चर्चगेट ते माहीम या पट्ट्यात दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जात आहे. मात्र वीजचोरांचे प्रमाण अधिक असल्याने विद्युत पुरवठा विभागाचे नुकसान वाढले आहे. या चोरांना शोधून काढण्यासाठी गस्त पथक रात्री धाड टाकत आहे. माझगाव येथील सीताफळ वाडीतील बॉम्बे टी स्ट्रेनर कंपनीवर बेस्टने शुक्रवारी धाड टाकली.या कंपनीने दोन मीटरमधून वीजचोरी करीत बेस्टचे दहा कोटी रुपयांचे नुकसान केले असल्याचे समोर आले. तसेच तिसऱ्या मीटरची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात बेस्टने एफआयआर दाखल केली आहे. या कंपनीत २०११ मध्येही वीज मीटरमध्ये फेरफार केल्याची तक्रार आली होती. तेव्हापासून बेस्टने त्यांच्यावर वॉच ठेवला होता. या कंपनीचा वीजपुरवठा तूर्तास खंडित करण्यात आला आहे.
वीजचोरांवर बेस्ट धाडसत्र, दहा कोटींची चोरी उघड
By admin | Published: May 14, 2017 1:37 AM