माणगाव (कोल्हापूर) : कर्नाटक येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हातकणंगले तालुक्यातील माणगावमध्ये उपसरपंच राजू मगदूम आणि सामाजिक कार्यकर्ते नेमगोंडा मगदूम यांनी या निवडणुकीच्या निकालावर 51 हजार रुपयांची पैज लावली आहे. या पैजेची सध्या माणगावात मोठी चर्चा आहे. विशेष म्हणजे, पैज जिंकलेली व्यक्ती संपूर्ण रक्कम वैष्णवी देवी मंदिराच्या विकासासाठी देणार आहे. कर्नाटकमधील निवडणुकीत काँग्रेस पक्ष बाजी मारणार, असं उपसरपंच राजू मगदूम यांना वाटतं. तर सामाजिक कार्यकर्ते पदमावती पाणी पुरवठा संस्थेचे माजी चेअरमन नेमगोंडा मगदूम यांना भाजपा विजयी होईल, याबद्दल ठाम विश्वास आहे. त्यामुळेच या दोघांनी 51 हजार रुपयांची पैज लावली असून त्याबद्दल लेखी मसुदादेखील तयार केला आहे. विशेष म्हणजे, जो कोणी ही पैज जिंकेल, त्यानं ती रक्कम वैष्णवी देवी मंदिराच्या विकासासाठी द्यायची, असा करार आहे. या करारावर सात साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यादेखील आहेत. कर्नाटकमध्ये सरकार कोणाचंही आलं किंवा पैज कोणीही जिंकलं, तरी फायदा मंदिराचा होणार असल्यानं या पैजेची चर्चा सध्या संपूर्ण माणगावात आहे.
Karnataka Election 2018 : निवडणूक कर्नाटकात, पैज कोल्हापुरात; अनोख्या पैजेची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 1:27 PM